Aadhar Card Bank Account Link Process : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज वेगाने भरले जात असून कोट्यवधी महिलांचे अर्ज स्वीकारलेही गेले आहेत. तर, १७ ऑगस्टपर्यंत कोट्यवधी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा निधी म्हणजेच तीन हजार रुपये जमाही झाले आहेत. परंतु, ज्यांची बँक खाती आधार कार्डला लिंक नाहीत, अशा महिलांचे अर्ज स्वीकारले गेलेले नाहीत. अशा महिलांना बँक खातं आधार कार्डला लिंक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, बँकेला आधार कार्ड कसं लिंक करायचं हेच काहींना माहिती नाही. त्यामुळे या लेखातून आम्ही तुम्हाला आधार कार्ड कसं लिंक कराल? याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. ऑफलाईन, वेबसाईटवरून, मोबाईल अॅपवरून, एटीएमचा वापर करून आणि एसएमएसद्वारे आधार कार्ड बँकेला कसं लिंक करायचं हे पाहुयात.
बँकेत जा आणि फॉर्म भरा
तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही एक अर्ज भरून आधार कार्ड लिंक करू शकता. आधार कार्डचा पुरावा दिल्यानंतर बँकेकडून तपासणी केली जाईल. त्यासाठी एक फॉर्म दिला जातो. हा फॉर्म भरल्यानंतर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक केलं जातं. या संदर्भातील माहितीही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाते.
इंटरनेट बँकिंगद्वारे करा लिंक
तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्ही आधार कार्ड लिंक करू शकता. संकेतस्थळावर Link Aadhar हे सर्च करा. तिथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर भरा आणि कन्फर्म करा. यानंतर बँकेकडून पुढील प्रक्रिया करून आधार कार्ड लिंक केलं जातं. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे कळवली जाते.
एटीएम कार्डद्वारे करा लिंक
बँकेच्या एटीएमद्वारेही तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करू शकता. मशिनमध्ये तुमचं कार्ड स्वाईप करा. त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशनचा पर्याय येईल. तिथे Aadhar Registration हा पर्याय दिसेल. तुम्हाला आता तुमचा अकाऊंट टाईप निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला १२ अंकी तुमचा आधार कार्ड नंबर दोनदा समाविष्ट करायचा आहे. यानंतर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक होईल. यासंदर्भातलही माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे कळवली जाईल.
बँकेच्या अॅपवरूनही करू शकता लिंक
प्रत्येक बँकेचं आता डिजिटल बँकिंगसाठी अॅप असतं. या अॅपवर लॉगिन करून तुम्ही Services किंवा Aadhar Linking वर जाऊन आधार कार्ड लिंक करता येईल. इथेही तुम्हाला आधार कार्ड नंबर समाविष्ट करून तुमचं आधार कार्ड लिंक केलं जाईल.
एसएमएसद्वारे करा लिंक
तुम्ही 567676 या क्रमांकावर UIDAadhar NumberAccount Number या फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवायचा आहे. तुम्ही दिलेली माहिती योग्य असेल तर आधार कार्ड लिंक झाल्याची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे कळवली जाईल.