Origins of Name May : मे हा इंग्रजी कॅलेंडर महिन्यातला पाचवा महिना. वर्षातील हा पाचवा महिना चक्क ३१ दिवसांचा असतो. मे महिन्यात जरी प्रचंड उष्णता असली तरी हा महिना सर्वांना आवडतो. मे महिन्यात लहान मुलांना शाळेला सुट्या असतात. अनेक जण गावी अथवा पर्यटनासाठी फिरायला जातात. अनेक ठिकाणी मे महिन्यात लग्नसोहळे पार पडतात. पाहुण्यांची ये-जा असते. घरोघरी आमरसाचा बेत केला केला जातो, मेजवान्या झडतात आणि त्यामुळे मे महिना प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. ‘मे’ हे एकाक्षरी नाव जरी तसे सोपे वाटत असले तरी या नावामागील इतिहास अत्यंत रोमांचक आहे. तुम्हाला माहितीये का या महिन्याला मे हे नाव कसे मिळाले? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
मे महिन्याचे नाव कसे पडले?
मे महिन्याचे नाव वर्षातील इतर महिन्यांप्रमाणे लॅटिन भाषेतून आले आहे. त्यासाठी तुम्ही रोमन लोकांचे, सम्राटांपासून ते पोपपर्यंत सर्वांचे आभार मानू शकता. मे हा शब्द १०५० च्या दशकात इंग्रजीत आला. तो जुन्या इंग्रजीतील मेयस (Maius) या शब्दापासून विकसित झाला, जो थेट लॅटिन मेयस या शब्दापासून घेतला आहे, ज्याचा अर्थ मेयस मेन्सिस (Maius mēnsis) म्हणजेच ‘मेयाचा महिना’ (Maia’s month) असा होतो.
पण मेया कोण आहे? ग्रीक देवी मेया ही एका शिकाऱ्याची पत्नी होती. ही मेया देवांचा दूत हर्मीसची आई होती; पण रोमन लोकांची मेया नावाची आणखी एक देवी होती, जिचे नाव योगायोगाने मेया होते. तिचे नाव नेब्युला (Nebula) असे होते. मेया हे ग्रीक नाव ‘mother, nurse, midwife’ या अर्थाच्या मूळ शब्दापासून घेण्यात आले आहे.
मेया ही प्रजनन आणि वसंत ऋतूची देवी आहे. मेयाला मायासुद्धा म्हणतात. ग्रीक पौराणिक कथांनुसार, ग्रीक देवी माया ही एक निसर्ग आणि वृक्षवाढ यांच्याशी संबंधित देवी होती. तिचा मे महिन्याशी संबंध होता. कारण- मे महिन्यात निसर्गात नवीन जीवन आणि वृक्ष फुलतात. त्यामुळे या देवीच्या नावावरून या महिन्याचे नाव मे असे पडले.
May Vs May
मे हा एक महिना आहे आणि एक सहायक क्रियापद आहे. हा भाषिक योगायोग आहे. एखाद्या कृतीविषयी शक्यता, क्षमता, आवश्यकता आणि परवानगी दर्शवली जाते तेव्हा हे क्रियापद वापरले जाते. मे हे क्रियापद जुन्या इंग्रजीतील mæg या शब्दावरून आले आहे. हे नाव जर्मनिक मूळ शब्दाशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ सक्षम असणे, पॉवरफूल असणे, शक्तिशाली असणे, असा होतो.