हॅकर्स हा शब्द आपल्यासाठी काही नवीन राहिलेला नाही. मात्र आपण अनेकदा विचार केला असेल की हॅकर्सने चोरलेला डाटा ऑनलाईन कसा विकला जातो आणि शेवटी त्याची किंमत किती असते. यासंदर्भातील एक रंजक माहिती नुकतीच समोर आली आहे. डार्क वेबवर यासाठी काम करणारी बाजारपेठ आहे, इंटरनेटमध्ये असा भाग आहे जिथे नावाबाबतच्या गुप्ततेचे नियम पाळले जातात आणि त्यामुळे त्याचा एक्सेस कुणालाही उपलब्ध नसतो. डाटा प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटी रिसर्च फर्म प्रायव्हसी अफेअर्सने डार्क वेब किंमत निर्देशांक २०२१ म्हणजेच इंटरनेटच्या काळ्या बाजारामध्ये माहिती किती रुपयांना विकली जाते यासंदर्भातील माहिती जारी केला आहे. ही आकडेवारी दर्शवते की चोरी केलेल्या वैयक्तिक माहितीची सरासरी किंमतीत वर्षानुवर्षे चढ -उतार होत आहे. तुमचा चोरीला गेलेला क्रेडिट कार्ड डाटा, डिजिटल पेमेंट खाती, क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स, सोशल मीडिया खाती, स्ट्रीमिंग सेवा, बनावट पासपोर्ट सहित प्रत्येक गोष्टीला किंमतीचा टॅग जोडलेला आहे.
क्लोन केलेल्या क्रेडिट कार्डांसह, हॅकर्सना प्रत्येक कार्ड सुमारे २५ डॉलर (१८७३ रुपये) मिळतात. यासपिन एक्सेस मास्टरकार्ड किंवा व्हिसा कार्ड्सची किंमत प्रत्येकी २५ डॉलर आणि अमेरिकन एक्सप्रेस ३५ डॉलर (२६२३ रुपये) आहे. १,००० डॉलरपर्यंत जमा शिल्लक असलेल्या क्रेडिट कार्डच्या डाटाची किंमत १५० डॉलर (११,२४३ रुपये) असू शकते. तसेच ज्यांच्याकडे ५००० डॉलर पर्यंत शिल्लक आहे त्यांना डार्क वेबवर २४० डॉलर (१७,९९० रुपये) मिळू शकतात. नासा, मॅकडोनाल्ड्स, मायक्रोसॉफ्ट, टी-मोबाईल, लॉकहीड मार्टिन, अगदी सायबर सुरक्षा कंपन्या फायरई आणि सोलरविंड यासारख्या उल्लेखनीय कंपन्या आणि संस्था २०२० मध्ये याला बळी पडल्या आहेत, असे सुरक्षा संशोधक झॅचारी इग्नोफो यांनी अहवालात म्हटले आहे.
क्रेडिट कार्ड डाटाची किंमत कशी ठरते
गोपनीयता प्रकरणांच्या संशोधकांनी या चोरीच्या तपशीलांच्या डार्क वेब मार्केट किमतींची तुलना गेल्या वर्षीच्या किमतींशी केली. तर यामध्ये वाढ झाली आहे. खात्यात किमान २००० डॉलर असलेल्या ऑनलाइन बँकिंग लॉगिनसाठी जास्तीत जास्त मूल्य ५५ डॉलरची (४,१२२ रुपये) वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ६५ डॉलर (४८७२ रुपये) किंमत होती आता १२० डॉलर (८,९९४ रुपये) आहे.
क्रेडिट कार्ड श्रेणीमध्ये, ज्या देशात कार्ड वितरीत केले गेले त्यानुसार किंमती बदलतात. हॅक केलेल्या ग्लोबल क्रेडिटला ३५ डॉलर (२,६२३ रुपये) मिळतात. तर यूके मध्ये वितरीत असेल तर २० डॉलर (१,४९९) मिळतात. त्याबरोबर इस्रायलमध्ये असेल तर ६५ डॉलर (४,८७२ रुपये) मिळतात.
सोशल मीडिया अकाऊंट्सचा देखील काळाबाजार
डार्क वेबवरील सोशल मीडिया अकाऊंट्सना देखील चांगली रक्कम मिळते. हॅक केलेल्या फेसबुक खात्याला ६५ डॉलर तर इंस्टाग्रामला ४५ डॉलर आणि ट्विटरला ३५ डॉलर (२६२३ रुपये) मिळतात. सर्व गुगल सेवांशी जोडलेले जीमेल खाते आणि संलग्न पेमेंट पद्धती हॅक केलेल्या डाटामुळे ८० डॉलर (५,९९६ रुपये) मिळतात.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हॅक केलेल्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. उदाहरणार्थ, फेसबुक खात्यावर आता १० डॉलर (७९४ रुपये) कमी मिळत आहेत. ऑनलाइन सबस्क्रिप्शनच्या बाबतीतही हेच आहे. नेटफ्लिक्स (१ वर्षाची सदस्यता) ४४ डॉलर (३२९७ रुपये) किंमत आहे तर Adobe Creative Cloud ची किंमत १६० डॉलर (११,९९२ रुपये) आहे. ईबे, शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून, भारतात कदाचित हे फार लोकप्रिय नसेल, परंतु वेबसाइटवर चांगली प्रतिष्ठा असलेले खात्यांच्या डाटाला प्रत्येकी १००० डॉलर (७४,९४९) मिळतात.