Rules For Gold Import From Dubai: प्रसिद्ध कन्नड अभनेत्री रान्या रावकडून सोमवारी रात्री बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं. त्यानंतर सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. रान्या राव हिच्याकडून काही जप्त करण्यात आलेले १४.८ किलो सोने अलिकडच्या काळातील या प्रकारची सर्वात मोठी कारवाई आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत देशभरात चर्चा होत आहे. याचबरोबर दुबईहून भारतात कायदेशीररित्या किती सोने आणता येते याबद्दलही चर्चा होत आहे.

भारतीयांसाठी सोने ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सोने भारतीयांच्या संस्कृती, परंपरा आणि वारशाचे प्रतीक आहे. लग्न समारंभ असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो, भारतीय लोक जवळच्या लोकांना सौभाग्याचे प्रतीक म्हणून सोन्याचे दागिने भेट देतात. अशात अनेकजण दुबईसारख्या देशांमध्ये, सोने स्वस्त दरात उपलब्ध असल्याने भारतीय लोक शक्य तितके सोने तेथून खरेदी करण्यास प्राधान्य देतात. पण, परदेशातून सोने खरेदी करण्यासाठी काही बंधने आहे. याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.

दुबईमध्ये सोने स्वस्त का आहे?

भारतीय लोक परवडणाऱ्या दरात सोने खरेदी करण्यासाठी अनेकदा दुबईला जातात. विवध कारणांमुळे दुबईमध्ये सोन्याचे दर भारताच्या तुलनेत स्वस्त आहेत. दुबईमध्ये सोन्याचे दर स्वस्त असण्याचे एक कारण म्हणजे सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर शून्य जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) आहे, तर भारत सोन्यावर ३% जीएसटी लादतो. याशिवाय, दुबईतील ज्वेलरी स्टोअर्स वाजवी घडणावळ शुल्क आकारतात, त्यामुळे दुबईमध्ये २४ कॅरेट सोने भारतापेक्षा अंदाजे ५% ते ७% स्वस्त मिळते.

दुबईहून भारतात सोने आणण्याची मर्यादा

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानुसार, दुबईमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर भारतीय यांना तेथून १ किलो पर्यंत सोने आणता येते. पण, सीमा शुल्क मुक्त सोन्याच्या मर्यादेपेक्षा जास्त सोने आण्यासाठी त्यांना सीमा शुल्क भरावे लागते.

पुरुष प्रवाशांसाठी शुल्कमुक्त सोन्याची मर्यादा

पुरुष प्रवासी कोणतेही सीमाशुल्क न भरता दुबईहून भारतात २० ग्रॅम (कमाल ५०,००० रुपये मूल्य) सोने आणू शकतो. भारतात सीमाशुल्कातून सूट मिळण्यासाठी तो या मर्यादेत सोन्याची नाणी किंवा बार घेऊन येऊ शकतो. पण, जर सोने २० ग्रॅम किंवा ५०,००० रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त ग्रॅमवर ​​सीमाशुल्क भरावे लागेल. पडताळणीसाठी प्रवाशांनी किंमत, शुद्धता आणि तारीख असलेले सोने खरेदीचे बिल अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागते.

महिला प्रवाशांसाठी शुल्कमुक्त सोन्याची मर्यादा

महिला प्रवाशांसाठी, दुबईहून शुल्कमुक्त सोन्याची मर्यादा ४० ग्रॅम (कमाल १ लाख रुपये) आहे. महिला दुबईहून परतताना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी दागिने, बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात सोने आणू शकतात. या मर्यादेपेक्षा जास्त सोने असल्यास सीमा शुल्क आकारले जाते.

मुलांसाठी शुल्कमुक्त सोन्याची मर्यादा

१५ वर्षांखालील मुले सीमा शुल्क न भरता जास्तीत जास्त ४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणू शकतात. यामध्ये मुलांना सोन्याच्या स्वरूपात दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश आहे. पण, दुबईहून सोने घेऊन येणाऱ्या किंवा खरेदी करणाऱ्या मुलाकडे मुलासोबत असलेल्या प्रौढांशी असलेल्या त्याच्या नातेसंबंधाचा ओळखीचा पुरावा आवश्यक आहे.

Live Updates