Home Loan Facility: स्वतःचं असं हक्काचं एक घर असावं. मेहनतीने उभारलेलं, प्रेमाने सजवलेलं, चार भिंतींनी आणि चार व्यक्तींनी जोडलेलं, ‘माझं’ म्हणता येईल असं घर! अशी प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यात अनेकजण आपलं अर्ध आयुष्य घालवतात. नाही म्हणायला हल्ली गृह कर्ज सवलतींमुळे आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्याटवर घर घेणे शक्य झाले आहे. पण तरीही कर्जाची परतफेड करताना आयुष्यभर राबण्याचा प्रश्न काही सुटत नाही. अगदी निवृत्तीच्या वयापुढेही अनेकांना या कर्जासाठी कष्ट घ्यावे लागतात. तुम्हाला माहित आहे का फायदे तोटे यांची जशी आपण आकडेवारी काढू शकतो अगदी त्याच प्रमाणे कितपत पगार असेल तर आपण किती किमतीचे व किती कर्ज डोक्यावर घेऊन घर घ्यायला हवे याचाही अंदाज बांधणे शक्य आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे कमावणाऱ्या व्यक्ती किती? त्यांचा पगार किती? तुमचे इतर खर्च किती? हे प्रश्न सोडवा, समजा एखाद्या घरात स्त्री व पुरुष दोघे काम करत असतील आणि दोघांची एकत्रित कमाई महिन्याकाठी १ लाख इतकी असेल तर त्यांना घरासाठी कर्ज घेताना २५ हजार मासिक हप्त्यावर घर घेणे फायदेशीर ठरू शकते. आपण जबाबदाऱ्यांचे वाटप करून एकाच्या पगारातून गृह कर्ज व एकाच्या पगारातून घर खर्च असेही पर्याय निवडू शकता. पण एक लक्षात घ्या तुम्ही घेत असणाऱ्या कर्जाचा मासिक हप्ता हा तुमच्या एकूण मासिक कमाईच्या केवळ २५ टक्केच असायला हवा.
आता २५ हजार मासिक हप्त्याने कर्ज घ्यायचे तुम्ही ठरवले तरी तुम्ही विकत घेऊ इच्छिणाऱ्या घराची किंमत सुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे. म्हणजेच अगदी २५ हजार हप्त्याने तुम्हाला ३०- ३५ लाखांचे कर्ज परत करायचे असेल तर कित्येक वर्ष जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या हप्त्याची रक्कम व घराची रक्कम यांचा ताळमेळ आवश्य साधा.
अनेकजण कर्ज घेतल्यावर पुढे करिअरमध्ये काहीच प्रगती करता येणार नाही असे समजून चिंता करतात. तुम्हाला जर आता या क्षणी अधिक पगार असेल पण भविष्यात एखाद्या वेगळ्या व्यवसायानिमित्त किंवा अन्य कारणाने मिळकत कमी होऊ शकते किंवा अस्थिर होऊ शकते अशी भीती असेल तर तुम्ही आताच डाऊन पेमेंट अधिक करून पुढची कर्जाची रक्कमच कमी करू शकता, जेणेकरून कमी हप्त्यांमध्ये सुद्धा तुम्हाला सहज परतावा करता येऊ शकतो.