मुंगीला सर्वात स्मार्ट कीटक म्हणून ओळखलं जातं. पृथ्वीवर कीटकांच्या अशा काही प्रजाती आहेत ज्या आपल्या वजनापेक्षा ५० पट अधिक वजन सहज उचलू शकतात, एवढंच नाही तर ५० पट अधिक वजनासह खूप लांबपर्यंत अंतरही पार करू शकतात. या कीटकांमध्ये मुंगीचा समावेश होतो. आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण होय हे खरं आहे. मुंगी अगदी कुठेही आढळते, अगदी तुमच्या घरात किंवा घराजवळ कुठेही पाहू शकता. मात्र, या मुंग्यांचे काही वैशिष्ट्यही असतं.
आज आपण एक मुंगी किती वजन उचलू शकते? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. मुंग्या ह्या त्यांच्या शरीराच्या वजनापेक्षा जास्त वजन वाहून नेण्यास सक्षम असल्याचं बोललं जातं. सामान्यतः त्यांच्या वजनाच्या १० ते ५० पट किंवा त्याहूनही जास्त वजन त्या वाहून नेहू शकतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण हे रहस्य त्यांच्या मजबूत स्नायूंमध्ये आणि बाह्य सांगाड्यात असतं.
दरम्यान, जर्नल ऑफ बायोमेकॅनिक्समध्ये प्रकाशित झालेल्या २०१४ च्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, सामान्य अमेरिकन फील्ड मुंगीच्या मानेचा सांधा मुंगीच्या वजनाच्या ५,००० पट जास्त दाब सहन करू शकतो. त्यामध्ये असंही म्हटलं की, मुंग्या खूप मजबूत असतात, कारण त्यांचे शरीर खूप हलके असते. त्यांच्या स्नायूंना जास्त आधाराची आवश्यकता नसते, म्हणून त्या त्यांची सर्व शक्ती इतर वस्तू उचलण्यात घालवू शकतात.
दरम्यान, जर मुंग्या इतकं जड वजन उचलू शकतात तर आपल्या जिज्ञासू मनांना स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की संपूर्ण मानवाला उचलण्यासाठी या लहान ‘पॉवरहाऊस’ किती एकत्र लागतील? यावर ब्लाइंडविव्हिंगचे सह-संस्थापक आणि जागतिक हॅकेथॉनचे विजेते सॅम मॅथ्यू यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
“उदाहरणार्थ आपण सरासरी ७० किलोग्रॅम वजनाचा माणूस घेऊ. मुंग्या त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १०-५० पट वजन उचलू शकतात (प्रजातीनुसार). आपण एक सामान्य अंदाज घेऊ, त्यांच्या शरीराच्या वजनाच्या २० पट. एका मुंगीचे वजन सुमारे ५ मिलीग्राम (०.००५ ग्रॅम किंवा ०.०००००५ किलोग्रॅम) असते”, असं त्यांनी म्हटलं.
मुंगी किती वजन उचलू शकते?
०.०००००५ किलो × २० = ०.०००१ किलो (प्रति मुंगी ०.१ ग्रॅम).
अशा प्रकारे ७० किलो वजन उचलण्यासाठी किती मुंग्या लागतील?
७० ÷ ०.०००१ = ७००,००० मुंग्या.