अलीकडच्या काही वर्षांत भारतामध्ये ‘चहाला वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो’ अशी एक म्हण रुढ झाली आहे. यावरून लक्षात येतं की, देशात चहा हा किती लोकप्रिय आहे. जगात सर्वाधिक चहाचं उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणात चहाचं उत्पादन होत असलं तरी, जवळपास ७० टक्के चहा हा देशातच प्यायला जातो. यावरून भारतात चहाचे ‘चहा’ते किती आहेत, हे लक्षात येतं. पण चहाचा शोध नेमका कसा लागला? आणि त्याचा जगभर प्रसार कसा झाला? यामागे एक रंजक कथा आहे.
खरं तर, चहा हा ब्रिटीश पेय असल्याचं मानलं जातं. भारतात मागील ३५० वर्षांपासून चहा प्यायला जातो. पण चहाचा इतिहास केवळ ३५० वर्षांचा नक्कीच नाही. चहाच्या शोधाची एक रंजक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार, इसवी सन पूर्व २७३७ मध्ये चिनमध्ये चहाचा शोध लागला. एकेदिवशी चिनी सम्राट ‘शेन नुंग’ एका झाडाखाली बसले होते. तेव्हा त्यांचा नोकर पिण्याचे पाणी उकळत होता. पाणी उकळत असताना संबंधित झाडाची काही पानं उकळत्या पाण्यात पडली.
पण शेन नुंग हे एक प्रसिद्ध वनौषधीशास्त्रज्ञ (हर्बलिस्ट) असल्याने त्यांनी नोकराकडून चुकून तयार झालेल्या पेयामध्ये आणखी काही पानं टाकली. ते ज्या झाडाखाली बसले होते, त्याच झाडाचं नाव ‘कॅमेलिया सायनेन्सिस’ (Camellia sinensis) होतं. याच झाडापासून बनवलेल्या पेयाला आज आपण ‘चहा’ म्हणतो. अशा प्रकारे चहाचा शोध लागला. पण या कथेत कितपत तथ्य आहे? हे सांगणं सध्याच्या घडीला कठीण आहे.
हेही वाचा- टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअपमधील ‘हे’ फरक तुम्हाला माहीत आहे का ? जाणून घ्या…
‘यूके टी अँड इन्फ्युजन असोसिएशन’च्या वेबसाईटनुसार, गेल्या अनेक शतकांपासून पश्चिम चीनमध्ये चहा पिण्याची सवय रुजली आहे. हान राजघराण्यांच्या (इसवी सन पूर्व २०६- इसवी सन २२०) कबरींमध्ये चहाचे कंटेनर सापडले होते. परंतु तांग राजघराणांच्या (इसवी सन ६१८ ते ९०६) काळात चहा हे चीनचे राष्ट्रीय पेय म्हणून स्थापित झालं. हे पेय लोकांना इतकं आवडलं की, आठव्या शतकाच्या उत्तरार्धात लू यू नावाच्या लेखकाने ‘चा चिंग किंवा चहा क्लासिक’ नावाचं पहिलं पुस्तक लिहिलं.
नंतरच्या काळात जपानी बौद्ध भिक्खूंनी जपानमध्ये चहाचा प्रसार केला. तत्पूर्वी त्यांनी शिक्षणाच्या निमित्ताने चीनमध्ये प्रवास केला होता. त्यानंतर चहा पिणं हा जपानी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला. अनेक समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये चहाचा वापर केला जाऊ लागला. अशाप्रकारे हळूहळू चहा सर्वदूर पोहोचला. सुरुवातीला, चहा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरला जात होता, परंतु त्याचे पेय तयार केले जात नव्हते. चहाचे पान चघळण्यात येत होते. नंतरच्या काळात त्या पानांपासून पेय तयार करण्याची परंपरा सुरू झाली. इसवी सनपूर्व ७२२ ते २२१ या कालखंडाच्या दरम्यान चीनमध्ये जेवणात चहाच्या पानांचा उपयोग केला जात होता. इसवी सन ६१८ ते ९०७ या दरम्यान तांग राजवंशाने चहाची अनेक झुडपे लावली होती.