राज्य सरकारने सर्व महिलांना एसटी बस(MSRTC) प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. तसा शासन अध्यादेश (GR) जारी करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना राज्य शासनाने एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून तिकीट दरात ५०टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. या सवलतीचा लाभ राज्यातील लाखो नागरिक सध्या घेत आहे. काही प्रवासी प्रवास करताना MSRTCच्या या सवलतीचा लाभ घेत आहे. आगाऊ तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बस स्थानकावर जाऊनच या आरक्षण सवलतीचा लाभ घ्यावा लागतो. मात्र अद्याप ऑनलाईन तिकीट काढताना या आरक्षण सवलतीचा लाभ कसा घ्यावा याबाबत प्रवासी संभ्रमात आहे.
खासगी ट्रॅव्हल बुकिंग वेबसाईटवरून एसटी प्रवासाकरिता ऑनलाईन तिकीट काढताना MSRTCच्या या सवलतीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना MSRTCच्या आरक्षण सवलतीचा लाभ घेण्यासाठी बस स्थानकाकडे धाव घ्यावी लागते. आज आम्ही तुमची ही समस्या सोडविण्यासाठी मदत करणार आहोत. ऑनलाईन तिकीट काढताना MSRTCच्या या सवलतींचा लाभ घेण्यासाठी काय करावे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
ऑनलाईन तिकीट काढताना MSRTCच्या आरक्षण सवलतींचा लाभ कसा घ्यावा?
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की, MSRTCच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला MSRTCच्या अधिकृत संकेतस्थळ अथवा MSRTCच्या अॅपवरून बुकिंग करावे लागेल, तेव्हाच तुम्हाला MSRTCने लागू केलेल्या सवलतींचा लाभ घेता येईल. तुम्हाला या अॅपवर वयाचा पुरावा द्यावा लागतो, त्यानंतर तुम्हाला आरक्षणाच्या सवलतीचा लाभ मिळतो.
हेही वाचा : चालत्या रेल्वेमधून तुमचा मोबाईल किंवा पर्स पडली तर त्वरित करा ‘हे’ काम! लवकर परत मिळू शकते सामान
MSRTCच्या अॅपवरून ऑनलाईन तिकीट कसे काढावे?
- सर्व प्रथम MSRTCचे अॅप डाऊनलोड करा.
- MSRTCचे अॅप सुरू झाल्यावर त्यावर तुमचे नाव, जन्मतारीख अशी वैयक्तिक माहिती देऊन तुमचे नवीन खाते उघडा आणि यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला गेस्ट यूजर हा पर्यायदेखील उपलब्ध आहे, जिथे तुम्ही थेट बुकिंग करू शकता. - तुम्ही कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत प्रवास करणार आहात ती निवडा. त्यानंतर ज्या दिवशी प्रवास करायाचा आहे ती तारीख निवडा.
- तुम्ही शिवनेरी, शिवशाही, शिवशाही स्लिपर आणि सर्व यांपैकी कोणत्या मार्गाने प्रवास करणार आहात तो पर्याय निवडा आणि बस शोधा. त्यानंतर तुम्हाला त्या तारखेला तुमच्या प्रवासमार्गावरील बसची माहिती दिसेल. त्यामुळे तुम्हाला बसची वेळ, मार्गदेखील दिसेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार बस निवडा.
- त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या बसची सर्व माहिती दिसेल आणि जागा निवडण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उपलब्ध सीट्स दिसतील, त्यांपैकी तुम्हाला हवी ती सीट निवडा.
हेही वाचा : आईस्क्रीमच्या काडीपेक्षा लहान कुत्रा पाहिलंय का? गिनिज बुकने दिला हा मोठा मान
- त्यानंतर कन्फर्मेशन स्क्रीन दिसेल, तिथे तुमच्या तिकिटाचे संपूर्ण पर्याय दिसतील. त्याखाली प्रवाशांचे नाव, वय, वयाचा पुरावा अशी माहिती भरावी लागेल.
- तुम्ही एकापेक्षा जास्त प्रवाशांची माहिती देऊ शकता. त्यानंतर नोंदवलेली प्रवाशांची माहिती दिसते. त्यानंतर तुम्हाला लॉग इन किंवा गेस्ट यूजर हा पर्याय दिसेल. दोन्हींपैकी एक पर्याय निवडून पुढे प्रवेश करा.
- तुम्हाला तुमच्या तिकिटाचे सवलतीनुसार शुल्क स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर तुम्हाला पैसे भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय आयडी असे पर्याय दिसतील.
तुम्हाला हवा तो पर्याय निवडून तुम्ही पैसे भरा. त्यानंतर तुमचे तिकीट बुक झाल्याची माहिती स्क्रीनवर दिसेल. तुम्ही नोंदवलेल्या मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीवरदेखील माहिती पाठविली जाईल. - सर्व MSRTCच्या वेबसाईटवरून तुमचे नवीन खाते उघडून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता आणि आरक्षणाच्या सवलतीचा लाभदेखील घेऊ शकता.