How To Become An Astronaut: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडीच महिन्याहून अधिक काळ अडकल्या आहेत. आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर येण्यासाठी आता फेब्रुवारी २०२५ ची वाट पाहावी लागणार आहे. बऱ्याच जणांना अंतराळ आणि खगोलशास्त्राबाबत कुतुहल असते. आता तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थाही (इस्रो) गगनयान मोहिमेच्या माध्यमातून अंतराळवीर अवकाशात पाठविणार आहे. यानिमित्ताने अंतराळवीर होण्यासाठी काय शिक्षण असावे किंवा कोणते कौशल्य अंगी असणे आवश्यक आहे? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनीच या प्रश्नाचे उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने दिले आहे.
अंतराळवीर होण्यासाठी कोणती कौशल्य असावीत?
एस. सोमनाथ यांनी नुकताच टीआरसी क्लिप्स या युट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना अंतराळवीर बनण्यासाठी काय करावे लागेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी एस. सोमनाथ म्हणाले की, सध्यातरी आपण भारतीय हवाई दलातील वैमानिकांना अंतराळवीर बनविण्याच्या कार्यक्रमात समाविष्ट करत आहोत. पण भविष्यात संशोधक आणि शास्त्रज्ञही अवकाशात जाऊ शकतील. आता कुठे आपण मानवी मोहिमांची सुरुवात करत आहोत. त्यामुळे आपल्याला उत्तम वैमानिकांची गरज आहे. भविष्यात जशा मोहिमा वाढतील, तसे शास्त्रज्ञही अंतराळात जाऊ शकतील. एस. सोमनाथ पुढे म्हणाले की, जीवशास्त्र शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ या क्षेत्रातील संशोधकांना भविष्यात अंतराळात जाण्याची संधी मिळू शकते.
हे वाचा >> एका महिन्यापेक्षा जास्त काळ अंतराळात राहिल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
सध्या हवाई दलाच्या कुशल वैमानिकांना संधी
पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये एस. सोमनाथ म्हणाले, अंतराळवीर होण्यासाठी हवाई दलाच्या कुशल वैमानिकांना प्राधान्य देण्यात येत आहे. उत्तम अंतराळवीर होण्यासाठी अनेक गुणांचे उत्तम मिश्रण असणे आवश्यक आहे. गगनयान अंतराळवीरांबाबत माहिती देताना ते म्हणाले की, अंतराळवीर होण्यासाठी सर्वात आधी संबंधित उमेदवार कुशल वैमानिक असणे आवश्यक आहे. हे वैमानिक नव्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याबरोबरच कोणतेही हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमान उडविण्याची क्षमता असणारे हवेत.
हे ही वाचा >> अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? अंतराळयानात नक्की काय बिघाड झाला?
अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण घेत असताना एका वेगळ्याच जगाचा परिचय होत असतो. त्यामुळे उमेदवार एका सैनिकाच्या भूमिकेतून पुन्हा विद्यार्थीदशेत येतो. अंतराळवीराला सतत नव्या गोष्टी शिकत राहण्याची सवय करून घ्यावी लागते, असेही एस. सोमनाथ म्हणाले.
गगनयान मोहिमेत अंतराळवीर होण्यासाठी काय करायला हवे?
एक चांगला अंतराळवीर होण्यासाठी तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक चपळता यांचे उत्तम मिश्रण असणे गरजेचे आहे. अंतराळवीरांना अभियांत्रिकी, गणित, अंतराळ विज्ञान आणि मेकॅनिक यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. असे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नंतर इस्रोसाठी आवश्यक असलेल्या प्रगत ज्ञानाची माहिती करून दिली जाईल. त्यामुळे हे उमेदवार इस्रोच्या शास्त्रज्ञाइतके सक्षम होतील.
शारीरिक क्षमता असणे आवश्यक?
तांत्रिक कौशल्य आणि बुद्धिमत्तेबरोबरच अंतराळवीर शारीरिकदृष्ट्या सक्षम असण्यावरही एस. सोमनाथ यांनी भर दिला. हाय एक्सलरेशन सहन करण्याची त्यांच्यात क्षमता असली पाहिजे. जे धष्टपुष्ट दिसतात असे लोकही कधी कधी हाय एक्सलरेशन सहन करू शकत नाहीत. तसेच त्यांची मानसिक ताकदही चांगली असायला हवी. विविध प्रकारच्या लोकांबरोबर त्यांना काम करावे लागणार आहे. त्यामुळे एखादी नवी अडचण समोर आली तर न डगमगता त्याला योग्य पद्धतीने तोंड देता यायला हवे.
आणखी वाचा >> Tesla Job Offer: ७ तास चालण्यासाठी टेस्ला कंपनी देणार एका दिवसाचे २८ हजार रुपये
सध्या चार जणांची अंतराळवीर मिशनसाठी निवड
गगनयान या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा झालेली आहे. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चौघांच्या नावांची मागेच घोषणा झाली असून अंतराळवीरांची भारताची ही पहिलीच तुकडी आहे. चारही जणांकडे प्रशिक्षित वैमानिक म्हणून अनुभव आहे, ज्यामुळे त्यांची निवड गगनयान मोहिमेसाठी योग्य मानली जात आहे.