भारतामध्ये फार पूर्वीपासून खेळला जाणारा कुस्तीचा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. आधी मातीमध्ये खेळली जाणारी कुस्ती आता विशिष्ट मॅटवर खेळली जाते. जगभरात कुस्तीचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. त्यात फ्रीस्टाइल कुस्ती हा प्रकार सर्वात लोकप्रिय आहे. १९०४ च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पहिल्यांदा कुस्तीचा समावेश करण्यात आला होता. ऑलिम्पिकसह इतर अनेक स्पर्धांमध्ये या खेळाचा समावेश केला जातो. भारताकडून बरेचसे कुस्तीपटू या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी लहानपणापासून कुस्तीचे धडे दिले जातात. बालपणी त्यांना कुस्तीपटू होण्याचे स्वप्न दाखवले जाते. कुस्तीपटू बनण्यासाठी काय करावे लागते याची आम्ही माहिती देणार आहोत.
कुस्तीचे दावपेच शिकण्यासाठी सर्वप्रथम योग्य प्रशिक्षक आणि कुस्तीच्या आखाड्याची निवड करणे आवश्यक असते. आखाडा किंवा ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन कुस्ती शिकण्यापूर्वी तेथील एकूण वातावरण आणि प्रशिक्षकांबाबत माहिती गोळा करावी. तेथे योग्य सोयीसुविधा आहेत की नाही याची खात्री करुन घ्यावी. अशा ठिकाणी अत्याधुनिक यंत्रे असणे अधिक फायदेशीर असते. आखाड्यातील/ ट्रेनिंग सेंटरमधील कुस्तीपटूच्या कामगिरीवरुन कुस्ती शिकवणारी व्यक्ती किती प्रभावशाली आहे हे ओळखता येते. प्रशिक्षकाकडे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याने या प्रशिक्षण क्षेत्राचे शिक्षण घेतले असल्यास जास्त फायदा होऊ शकतो.
पुरुष कुस्तीपटूंची वजनानुसार श्रेणी
- School : Under 14 – ३० ते ६० किलो, Under 17 – ४२ ते १०० किलो, Under 19 – ४२ ते १२० किलो
- Sub-Junior : Under 17 – ४२ ते १०० किलो
- Junior : Under 20 – ५० ते १२० किलो
- Senior (वयवर्ष १८ पेक्षा जास्त) : ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८४, ९६ आणि १२५ किलोपर्यंत आवश्यक वजन असते.
महिला कुस्तीपटूंची वजनानुसार श्रेणी
- School : Under 14 – ३० ते ६० किलो
- Sub-Junior : Under 17 – ३८ ते ७० किलो
- Junior : Under 20 – ४४ ते ७२ किलो
- Senior (वयवर्ष १८ पेक्षा जास्त) : ४८, ५३, ५५, ५८, ६०, ६३, ६९ आणि ७५ किलोपर्यंत आवश्यक वजन असते.
State Level कुस्तीपटू
जर एखाद्या व्यक्तीला भविष्यात कुस्तीपटू बनायचे आहे, तर त्याला वयवर्ष ६ ते १० दरम्यान ट्रेनिंग करायला सुरुवात करणे आवश्यक असते. राज्य किंवा राष्ट्र स्तरीय कुस्तीपटूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाकडे जाऊन अभ्यास करावा लागतो. ट्रेनिंग करताना विविध गोष्टी कराव्या लागतात. डाएट फॉलो करावे लागते. अनेक राज्यस्तरीय कुस्तीच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागतो. आजकाल कुस्तीपटूंचे क्लब्स देखील असतात, त्यामध्ये सहभाग घेणे फायदेशीर ठरु शकते. आपल्या देशात राज्य पातळीवर कुस्तीच्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धांमध्ये भाग घेणारे कुस्तीपटू हे State Level कुस्तीपटू असतात.
National Level कुस्तीपटू
राज्यस्तरावरील कुस्तीपटूंच्या ऐवजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे कुस्तीपटू हे National Level कुस्तीपटू असतात. या स्पर्धांना भारताकडून कुस्तीपटूंचा संघ पाठवला जातो. भारतासह इतर देशांचे कुस्तीपटूदेखील स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात. आपल्या देशामध्ये Senior National Wrestling Championship, Youth National Wrestling Championship अशा काही कुस्तीच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.