How To Check Outstanding Loans Linked To PAN Card : होम लोन, पर्सनल लोन, व्हेईकल लोन असे कर्जांचे विविध प्रकार आपल्याला माहीत आहेतच. आपण जवळपास सगळेच विविध प्रकारचं कर्ज घेतो आणि त्याचे सुलभ हप्ते फेडत असतो. अशा वेळी अचूक आर्थिक नोंदी ठेवण्यासाठी पॅन कार्डच्या मदतीने कुठलं कर्ज किती राहिलं आहे ते जाणून घेता येतं.
कर्ज काढून आर्थिक व्यवहार करणं सोपी आणि सुलभ प्रक्रिया झाली आहे
सध्याच्या घडीला आर्थिक व्यवहार करणं हे अत्यंत सोपं आणि सुलभ झालं आहे. आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताळेबंध ठेवणं कुठल्या तारखेला हप्ता आहे? कुठलं कर्ज किती राहिलं आहे हे जाणून घेण्यासाठी पॅन कार्डची ( PAN Card ) मोलाची मदत होते. समजा एखाद्या माणसाने गृह कर्ज आणि व्यक्तीगत कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घेतलं असेल तर त्या दोन्हीची थकीत रक्कम पॅन कार्डच्या ( PAN Card ) मदतीने जाणून घेता येते. कसं काय? हे आपण जाणून घेऊ.
वैयक्तिक कर्ज म्हणजे काय?
वैयक्तिक कर्ज हे घराची डागडुजी तसंच रंगकाम करणं, वैद्यकीय बिलं, शिक्षण किंवा प्रवास अशा विविध कारणांसाठी घेतली जातात. सुरक्षित कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जांना काहीही तारण ठेवण्याची गरज नसते. बँकेत खाते असल्यासही एका विशिष्ट मंजूर रक्कमेपर्यंत कर्ज घेता येतं. क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीची क्षमता या दोन गोष्टी विचारात घेऊन हे कर्ज दिलं जातं. पॅन कार्डच्या ( PAN Card ) मदतीने कर्जाची थकीत रक्कम शोधण्याचे मार्ग तीन आहेत.
पॅन कार्डच्या मदतीने थकीत कर्ज कसं तपासता येतं?
क्रेडिट ब्युरो तुमच्या पॅनशी जोडण्यात आलेल्या कर्जाचे तपशील आणि सविस्तर माहिती देतात. यासाठी क्रेडिट ब्युरोच्या वेबसाईटला भेट द्या. त्यामध्ये नोंदणी करा. नोंदणीसाठी तुम्हाला पॅन क्रमांक, तुमचा पत्ता आणि इतर तपशील विचारले जातील. तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर पाठवण्यात आलेला ओटीपी वापरा आणि ओळख पटवा. ज्यानंतर तुम्हाला क्रेडिट रिपोर्टद्वारे तुमचं थकीत कर्ज किती आहे ते पाहता येईल.
थकीत कर्ज जाणून घेण्याचा दुसरा मार्ग काय आहे?
Fintech Apps वापरुन कर्ज किती राहिलं आहे याचा मागोवा घेता येतो. विश्वासार्ह आणि व्हेरिफाईड असलेलं Fintech App फोनवर किंवा लॅपटॉपवर डाऊनलोड करा. त्यात तुमचा पॅन क्रमांक आणि केवायसी तपशील वापरुन नोंदणी करा. लॉग इन केल्यानंतर कर्ज देणाऱ्या भागात जा तिथे कुठली कर्जे सुरु आहेत ते तुम्हाला समजू शकेल.
थकीत कर्ज जाणून घेण्याचा तिसरा मार्ग काय?
थकीत कर्ज जाणून घेण्याचा तिसरा मार्ग म्हणजे ज्या बँकेचं कर्ज घेतलं आहे त्यांचं मोबाइल बँकिंग वापरु शकता. त्यामध्ये तुमचे सगळे तपशील असतात. लोन अकाऊंट क्रमांक हा पर्याय निवडल्यास तुम्हाला कर्ज किती उरलं आहे ते समजतं.
तुमच्या पॅनशी लिंक असलेल्या कर्जांचा आढावा घेत राहिल्याने कर्ज किती उरलं आहे, कुठल्या तारखेला हप्ता जाणार आहे? व्याज आणि मुद्दल यांच्या रकमा किती आहेत? कर्जाची किती वर्षे उरली आहेत? ही सगळी माहिती तुम्हाला मिळते.