Smartphone Hacks for Hidden Cameras: नव्या नव्या ठिकाणी फिरायला जाणं, हे अनेकांना आवडतं. पण हल्ली सुरक्षिततेबाबत अनेकजण काळजी व्यक्त करतात. अनेक जोडप्यांना हॉटेलमध्ये असलेले छुपे कॅमेरे किंवा महिलांना प्रवासात शौचालयातील छुप्या कॅमेऱ्यांची भीती वाटत असते. या छुप्या कॅमेऱ्यांमुळे आता पर्यटनातील गोपनीयता धोक्यात आलेली आहे. त्यामुळेच पर्यटक आता अधिक दक्ष असतात. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन अशा छुप्या कॅमेऱ्यांचा शोध घेण्यास मदत करू शकतो. हॉटेल किंवा शौचालयातील छुपे कॅमेरे कसे शोधून काढायचे, याबाबतची माहिती घेऊ.
स्मार्टफोनच्या फ्लॅशलाइटचा वापर करा
मोबाइलमधील फ्लॅशलाइटचा वापर विविध पद्धतीने करता येऊ शकतो. रुममध्ये कॅमेरे कितीही लपवून ठेवलेले असले तरी त्यावर प्रकाश पडताच, कॅमेऱ्याचे लेन्सही चकाकते. हे कसे करायचे ते पाहू.
- हॉटेल रुममधील सर्व दिवे बंद करा
- स्मार्टफोनचा टॉर्च सुरू करा आणि हवा मोकळी राहण्यासाठी केलेले एअर व्हेंट्स, स्मोक डिटेक्टर, अलार्म घड्याळ आणि आरशांवर टॉर्च मारा.
- टॉर्च मारल्यानंतर तिथे लहानसा चमकणारा बिंदू किंवा लेन्ससारखा पृष्ठभाग दिसतो का पाहा.
स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून इन्फ्रारेड लाईट्स शोधा
अनेक छुप्या कॅमेऱ्यांना इन्फ्रारेड (IR) लाईट्स असतात. जे मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. पण स्मार्टफोनचे कॅमेरे हा लाईट सहज शोधू शकतात.
- हॉटेलच्या रुममधील दिवे बंद करा किंवा त्याचा प्रकाश कमी करा.
- स्मार्टफोनमधील कॅमेरा सुरू करून व्हिडीओ पर्यायावर जा. (काही फोनमध्ये फ्रंट कॅमेरा वापरून ही पद्धत वापरा)
- स्मार्टफोनचा कॅमेरा हळूहळू संपूर्ण खोलीत हळूहळू पॅन करा. जिथे जिथे कॅमेरा लपवला असण्याची शक्यता आहे, तिथे तुमचा कॅमेरा न्या.
- तुमच्या कॅमेऱ्याच्या व्हिडीओमध्ये लहान चमकणारे ठिपके दिसत आहेत का पाहा.
- इन्फ्रारेड लाईट छुपे कॅमरे असल्याची खूण दर्शवितात.
कॅमेरा डिटेक्शन ॲपचा वापर करा
आयओएस आणि अँड्राईड प्ले स्टोअरवर छुपे कॅमेरे शोधणारे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. याचांही वापर करता येईल. हे ॲप्स आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून छुपे कॅमेरे शोधण्यास मदत करतात. या ॲप्सच्या मदतीने इन्फ्रारेड लाईट्स, मॅग्नेटिक फिल्ड्स आणि नको असलेले सिग्नल शोधता येतात. त्यामुळे असे ॲप वापरणे कधीही सोपे.
वाय-फाय नेटवर्क तपासा
मोबाइलची वाय-फाय सेटिंग्ज सुरू करून त्यावर किती वाय-फाय उपलब्ध आहेत, हे तपासा. कधी कधी छुपे कॅमेरे वाय-फायने जोडलेले असतात आणि चित्रित केलेल फुटेज इंटरनेटद्वारे पाठवले जात असते.
- मोबाइलमधील वाय-फाय सेटिंग्जद्वारे कोणकोणते वाय-फाय उपलब्ध आहे, हे तपासा.
- क्रमांक, चिन्ह, तसेच आयपी कॅमेरा, कॅमेरा अशी नावे असलेले वाय-फाय नेटवर्क शोधा
- अशाच प्रकारे ब्लूटूथ सेटिंग्ज सुरू करूनही तुम्हाला डिव्हाइसचा शोध घेता येईल.
छुपे कॅमेरे शोधणे महत्त्वाचे का?
हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे असल्यामुळे अनेकांचे खासगी आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्यामुळे पर्यटकांना छुप्या कॅमेऱ्याची चिंता सतावते. हल्ली अतिशय लहान कॅमेरे बाजारात उपलब्ध झाल्यामुळे ते घड्याळ, यूएसबी चार्जर, शोभेच्या वस्तू यामध्ये कुठेही लपवता येतात. या कॅमेऱ्याद्वारे पर्यटकांचे खासगी क्षण चित्रित करून त्याचा गैरवापर करण्यात येतो. त्यामुळेच पर्यटकांना सुरक्षेच्या कारणास्तव छुपे कॅमेरे शोधणे महत्त्वाचे झाले आहे.