महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून इन्फ्लूएंझा H3N2 विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सर्दी, खोकला, ताप अशी या विषाणूची सामान्य लक्षणे आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत इन्फ्लूएंझाच्या ३६१ रुग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, सांगली आणि कोल्हापूरात याचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. राज्यात वेगाने पसरणारा H3N2 विषाणू हा इन्प्लूएंझा A च्या H1N1 च्या म्युटेट व्हेरिंएट आहे. काही वर्षांपूर्वी H1N1 व्हायरसचा प्रसार झाला. इन्फ्ल्यूएंझा टाईप एचे हे दोन्ही उपप्रकार आहेत.
H1N1 आणि H2N2 चा H3N2 हा बदलेला प्रकार आहे. हा एक सामान्य इन्फ्लूएंझा स्ट्रेन आहे. मात्र कोरोना विषाणूप्रमाणेच हा व्हायरस वेगाने पसरतो आहे. संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने कोरोना महासाथी इतकीच गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी देखील राज्यात H3N2 आणि कोविडची प्रकरणे पुन्हा वाढत असल्याचा इशारा देत नारिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाकण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे या दोन्ही व्हेरिएंटच्या वाढत्या संसर्गामुळे आता नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये? संसर्ग झाला तर तो कसा ओळखावा? कोणती औषधं घेणं टाळलं पाहिजे जाणून घ्या…
H1N1 व्हायरस नेमका काय आहे? त्याची लक्षणे?
H1N1 विषाणू स्वाइन फ्लूच्या रुपाने ओखळला जातो. प्रामुख्याने स्वाइन फ्लू (इन्फ्लूएंझा) विषाणूच्या स्ट्रेनमुळे H1N1 हा म्युटेशनने तयार होतो. याची लक्षणे सामान्य फ्लूसारखीच असतात. यामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे आणि थकवा यांचा समावेश होतो. संसर्ग झालेल्यांमध्ये जुलाब आणि उलट्या या समस्याही जाणवू शकतात. याशिवाय थंडी वाजून येणे आणि थकवा यांसारख्या समस्यांचाही समावेश आहे. परंतु ही लक्षणं लवकर बरी होतात,
H3N2 विषाणूचा संसर्स झाला कसा ओळखायचा?
H3N2 विषाणू हा इन्प्लूएंझा A च्या H1N1 च्या म्युटेट व्हेरिंएट आहे. या विषाणूचा संसर्ग जवळपास २ ते ३ आठवड्यापर्यंत जाणवतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, नाकातून पाणी वाहणे आणि श्वसनाचा त्रास ही H3N2 व्हायरसची लक्षणं आहेत. याशिवाय लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि जठरासंबंधीत समस्या दिसू शकतात. ताप काही दिवसात कमी होतो पण खोकला वाढतचं जातो, हा संसर्ग ८ ते १० दिवस त्रासदायक असतो.
‘या’ विषाणूंचा सर्वाधिक धोका कोणाला?
H1N1 आणि H3N2 विषाणू हे इन्प्लूएंझा A चे उपप्रकार असल्याने त्याची लक्षणे थोडीफार समान आहेत. मात्र याची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. विशेषत: आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला WHO ने दिला आहे.
नेमकी काळजी कशी घ्याल?
गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावा, डोळे आणि नाक यांना वारंवार स्पर्श करू नका, खोकला आल्यावर किंवा शिंक आल्यावर तोंडावर रूमाल ठेवा, अंगदुखी किंवा ताप आला तर पॅरासिटामोल घ्यावी
नेमकं काय टाळावं?
एकमेकांशी हात मिळवणं शक्यतो टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक घेऊन नये, अगदी शेजारी-शेजारी बसून खाऊ नये.
कोणती औषधं घ्यावी आणि कोणती घेऊ नये?
अमोक्सिसिलिन, नॉरफ्लॉक्सासिन, ओप्रोफ्लॉक्सासिन, ऑफ्लोक्सासिन, लेव्होफ्लोक्सासिन या अँटिबायोटिक्स औषधांचा वापर टाळा. तसेच ओसेल्टामिविर, झानामिविर, पेरामिविर, बालोक्सावीर या अँटिबायोटिक्स औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ताप, सर्दी सारखी लक्षणं आढळल्यास रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. तसेच शरीर चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. ताप कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं औषधं घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
गुरुवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात H3N2 प्रकरणांमध्ये २०० टक्के वाढ झाली आहे. यात १ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत H3N2 च्या एकूण ११९ रुग्णांची नोंद झाली तर H1N1 चे ३२४ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत २,६६,९१२ संशयित प्रकरणे नोंद झाली आहे. या विषाणूजन्य आजारांमुळे ७३ रुग्ण दाखल आहेत. राज्यात H1N1 आत्तापर्यंत ३ आणि H3N2 च्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ७३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.