ITR Filling Without CA: प्राप्तीकर भरणे (ITR) ही प्रत्येक करदात्याची मूलभूत जबाबदारी आहे. सरकारी नियमांचे पालन करणे आणि आपल्या मिळकतीवर करणे भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. यासाठी अनेकजण चार्टर्ड अकाउंटंट्सवर (सीए) अवलंबून असतात. परंतु, प्राप्तीकर भरण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ असून नागरिक स्वतःहूनही कर भरू शकतात. सीएशिवाय कर कसा भरायचा? याची माहिती या लेखातून घेऊ.
२०२४-२५ हे आर्थिक वर्ष संपत आहे. त्यामुळे अनेक करदाते चार्टर्ड अकाउंटंट्सची मदत न घेता स्वतःच प्राप्तीकर भरण्याचा विचार करत असतील. आपले उत्पन्न जाहीर करणे याशिवाय कराचा परतावा किंवा कर्ज मिळविण्यासाठी आणि व्हिसाचा अर्ज करण्यासाठी आयटीआर भरणे आवश्यक असते.
सीएशिवाय आयटीआर कसा भरायचा?
१. पोर्टलवर नोंदणी करत लॉगिन करा
सर्वात आधी आपल्या पॅनकार्डच्या आधारे इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर आपले खाते तयार करावे लागेल. त्यानंतर ई-फायलिंगचा पर्याय निवडून तिथे आयकर भरण्याचा पर्याय निवडावा लागेल. या पर्यायानंतर ज्या आर्थिक वर्षाचा प्राप्तीकर भरायचा आहे, ते वर्ष सिलेक्ट करावे लागेल.

२. आवश्यक कागदपत्रे गोळा करा
प्राप्तीकर भरण्याचे वर्ष सिलेक्ट केल्यानंतर प्राप्तीकर भरत असलेला स्टेटस ठरवावा लागेल. यामध्ये वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब आणि इतर असे तीन पर्याय येतात. यापैकी वैयक्तिक हा पर्या निवडून पुढे जायचे.

३. योग्य फॉर्म निवडा
आयटीआर भरताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योग्य फॉर्म निवडणे. उदाहरणार्थ आयटीआर-१ (सहज), आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-४, आयटीआर-५, आयटीआर-६ आणि आयटीआर-७. निवडलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
४. माहितीची खातरजमा करा
आपली वैयक्तिक माहिती जसे की, पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्म तारीख, मोबाइल नंबर, बँक स्टेटमेंट, फॉर्म १६ किंवा पगाराची स्लिप असे उत्पन्नाचे तपशील (जर असतील तर), गुंतवणूक आणि मालमत्तेचे तपशील यासारखी आवश्यक कागदपत्रांची माहिती भरावी लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर प्राप्तीकराची उर्वरित रक्कम भरायची असल्यास तसा पर्याय येईल.
५. ई – व्हेरिफाय आयटीआर
शेवटचा टप्पा म्हणजे आपली माहिती पडताळून ते भरणे. यासाठी ३० दिवसांचा अवधी मिळतो. आधारचा ओटीपी मागवून, ईव्हीसी, नेट बँकिंग किंवा बंगळुरू येथील सीपीसी कार्यालयाला प्रत्यक्ष आयटीआर व्हेरिफायची कॉपी पाठवू शकता.
स्वतःहून आयटीआर भरण्याचे फायदे काय आहेत?
स्वतःहच आयटीआर भरल्यामुळे एकतर सीएला द्याव्या लागणाऱ्या पैशांची बचत होते. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीची माहितीही गुप्त ठेवता येते. स्वतः आयटीआर फाईल केल्यामुळे करासंबंधीचे कायदे, आर्थिक नियोजन हे समजून घेण्याची संधी मिळते. तसेच आपण स्वतः आयटीआरच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे ही प्रणाली कसे काम करते, याचीही समज येते.
कोणत्या वजावटी उपलब्ध आहेत. त्यानुसार आर्थिक निर्णय कसे घ्यावे, हेही जाणून घेता येते. भविष्यात आपण अधिक चांगले अर्थ नियोजन करण्याची तयारी या माध्यमातून होते. तसेच स्वतःहून आयटीआर फाइलिंग केल्यामुळे वेळेचीही बचत होते.