भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. पण तुम्ही गणरायाची जी मूर्ती पूजताय ती पीओपी आहे की मातीची? पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही हट्टाने मातीची मूर्ती आणली असेलही, पण ती खरंच मातीची आहे का? मातीची मूर्ती आणि पीओपी मूर्ती यातला फरक ओळखणं फार सोपं आहे. तुमची पारखी नजर या दोन्ही मूर्तीतला फरक सहज ओळखू शकते.
१) मूर्तीचं वजन पाहावं
मातीची मूर्ती आणि पीओपी मूर्ती यातील फरक समजून घ्यायचा असेल तर सर्वांत सोपा उपाय म्हणजे वजन. मातीची मूर्ती वजनाने फार जड असते. तर, शाडूची मूर्ती वजनाने हलकी असते. पण, गेल्या काही वर्षांत ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने पीओपी मूर्तीच्या तळाशी वजनदार वस्तू भरल्या जातात. जेणेकरून पीओपी मूर्ती मातीची मूर्ती सांगून विकली जाईल. पण अशावेळी मूर्ती आतील बाजूस थोडी कोरून पाहावी, अवजड वस्तू नजरेस पडल्यास ती पीओपी मूर्ती समजावी. अन्यथा ती मातीचीच मूर्ती असेल.
२) मातीच्या मूर्तीसाठी वापरतात लाकडी पाट
मातीची मूर्ती हाताने घडवली जाते. त्यामुळे, मातीची मूर्ती घडवताना लाकडी पाटाचा वापर केला जातो. गणपती बाप्पाची मूर्ती लाकडी पाटावर असेल तर ती मातीची मूर्ती समजावी.
हेही वाचा >> Ganesh Chaturthi 2023: मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींचे दर्शन घ्यायचे आहे? पण तिथे पोहोचायचे कसे? जाणून घ्या…
३) तुमची मूर्ती चमकतेय का?
मूर्तीचं वजन पाहिलं, लाकडी पाट पाहिल्यानंतरही मातीच्या मूर्तीबाबत तुम्ही साशंक असाल तर मूर्तीची चमक एकदा पाहून घ्या. पीओपी मूर्ती अधिक चमकदार असते. तर, मातीच्या मूर्तीला फार चमक नसते.
४) मूर्तीचे अवयव पाहा
पीओपीच्या मूर्ती साचातून तयार केल्या जातात. त्यामुळे या मूर्ती एकसलग असतात. मूर्तीतील उंदीरही छान चिकटून बसलेला असतो. परंतु, मातीच्या मूर्तीतील अवयव दूरदूर असल्याचे दिसतात. तर, मूर्तीवर उंदीरही चिकटलेला नसतो. त्यामुळे मूर्ती निरखून पाहिल्यास तुम्हाला हा फरक नक्कीच जाणवू शकेल.
५) मूर्तीच्या मागील छिद्र पाहा
मातीची मूर्ती वाळायला वेळ लागतो. तर, पीओपीची मूर्ती तुलनेने कमी वेळ घेते. मातीची मूर्ती योग्यपद्धतीने सुकावी याकरता मागे एक छिद्र दिलेले असते. या छिद्रामुळे मातीच्या मूर्तीला भेगाही पडत नाहीत. पीओपी मूर्तीला असे छिद्र नसते. त्यामुळे मूर्तीच्या मागील छिद्र पाहून तुम्ही मूर्ती मातीची आहे की पीओपीची हे ओळखू शकाल.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव का साजरा करावा?
गेल्या काही वर्षांत पीओपी मूर्तींचा वापर वाढल्याने जलप्रदुषणाची मोठी चिंता निर्माण झाली आहे. पीओपी मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने समुद्रातील जैवविविधतेला धोका पोहोचतो, तसंच गाळही साचून राहतो. परिणामी भरपूर पाऊस पडल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते. ही संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येते. या अंतर्गत पीओपी मूर्ती व्यतिरिक्त शाडूच्या मातीची किंवा इतर तत्सम नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या मूर्तीची पूजा करण्याचे आवाहन करण्यात येते.
पीओपीचा वापर का वाढला?
पीओपी मूर्ती साच्यापासून तयार करतात. त्यामुळे ती झटपट होते. पीओपीची मूर्ती कितीही उंच बनवता येते. मातीच्या मूर्तीपेक्षा ती टीकायलाही मजबूत असते. शिवाय वजनाने हलकी असल्याने हाताळणेही सोपे जाते. त्याउलट, शाडूच्या मूर्ती जड असतात. मातीची असल्याने ती काळजीपूर्वक हाताळावी लागते. या मूर्ती फार उंच बनवता येत नाहीत. शिवाय, माती महाग मिळते परिणामी मूर्तीची किंमतही वाढते.