तुमच्या मोबाइल फोनचा IMEI नंबर (आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांक)/(इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेन्ट आयडेंटिटी) हा तुमच्या उपकरणाचा ओळख क्रमांक आहे. हा क्रमांक उपकरण ओळखण्यासाठी व काही वेळा ते शोधण्यासाठी उपयोगी ठरतो. मात्र, दैनंदिन जीवनात आपण IMEI नंबरकडे फारसे लक्ष देत नाही. त्याचा फारसा उपयोग होत नाही, असेही वाटते. पण काही विशिष्ट प्रसंगी IMEI नंबर असणे खूप महत्त्वाचे ठरते. जसे की, जेव्हा तुम्ही तुमचा फोन विक्रीसाठी देणार असाल, तेव्हा नवीन खरेदीदार खरेदीच्या पावतीवर असलेला IMEI नंबर तपासून तो फोन चोरीचा तर नाही, याची खात्री करू शकतो. चोरीच्या घटना घडल्यास IMEI नंबर पोलिसांना फोन शोधण्यासाठी देखील उपयोगी ठरतो. आता, iPhone किंवा Android डिव्हाइसचा IMEI नंबर कसा शोधायचा, याचे तीन सोपे मार्ग जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पद्धत १: फोनच्या पॅकेज बॉक्सवरून IMEI नंबर शोधा

तुमच्या फोनचा IMEI नंबर शोधण्यासाठी फोनचा वापर न करता, फोनच्या मूळ पॅकेज बॉक्सवरून तो सहज शोधता येतो. तुम्हाला फक्त तुमच्या फोनचे मूळ पॅकेज बॉक्स शोधावे लागेल. त्या बॉक्सवर IMEI नंबर दिलेला असेल. तो १५-अंकी नंबर असतो. जर तुमच्याकडे ड्युअल सिम फोन असेल, तर दोन वेगवेगळे १५-अंकी IMEI नंबर असतील. हा नंबर बॉक्सच्या मागील बाजूस किंवा एखाद्या कोपऱ्यात दिलेला असेल.

पद्धत २: IMEI नंबर शोधण्यासाठी डायल करा

हा मार्ग iPhone किंवा Android दोन्हीवर लागू होतो. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:

स्टेप १: फोन डायलर उघडा.
स्टेप २: *#06# टाइप करा आणि स्क्रीनवर IMEI नंबरची माहिती देणारा बॉक्स येईल.

तुमच्या फोनमध्ये किती सिम स्लॉट आहेत, त्यानुसार एक किंवा दोन IMEI नंबर दिसतील. येथे दिलेला नंबर तुम्ही कॉपी करू शकता.

पद्धत ३: फोनच्या सेटिंग्जमध्ये IMEI नंबर शोधा

Android डिव्हाइससाठी:
स्टेप १: सेटिंग्ज अॅप उघडा.
स्टेप २: तुमच्या फोनच्या मॉडेलनुसार ‘About Phone’ किंवा ‘फोन विषयी’ हा पर्याय शोधा.
स्टेप ३: ‘About Phone’ मध्ये IMEI नंबर नमूद केलेला असेल.

iPhone साठी:
स्टेप १ iPhone वर सेटिंग्ज अॅप उघडा.
स्टेप २ ‘General’ (सामान्य) वर टॅप करा.
स्टेप ३ ‘About’ (माहिती) वर टॅप करा.
स्टेप ४ खाली स्क्रोल करा आणि IMEI नंबर दिसेल.

या सोप्या पद्धतींच्या मदतीने तुम्ही तुमच्या डिव्हाइसचा IMEI नंबर सहज शोधू शकता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to find your mobile imei number 3 easy methods psg