बाळांना दर २ ते ३ दिवसांनी अंघोळ घालण्याची गरज असते. त्यांच्या त्वचेच्या स्वच्छतेसाठी फक्त पाणी पुरेसे ठरत नाही. लहान बाळांसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले ‘क्लिंजर’ वापरणे योग्य ठरते. अंघोळीसाठी पाणी कोमट आणि बाळाला आरामदायी वाटेल असे असावे. लहान बाळांच्या अंगातून बऱ्याच प्रमाणात उष्णता अतिशय पटकन बाहेर निघून जात असते त्यामुळे बाळाला ज्या खोलीत अंघोळ घालणार आहात ती खोली स्वच्छ, चांगली आणि उबदार असावी. बाळाला अंघोळ घालताना तुमचा हात कायम त्यांच्या अंगावर असावा, कपडा किंवा क्लिंजर अशी कोणतीही वस्तू घ्यायची झाल्यास बाळाच्या अंगावरील तुमचा हात अजिबात बाजूला होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.
बाळाला अंघोळ घालणे म्हणजे बाळासोबत बोलण्याची, त्याला / तिला गाणी म्हणून दाखवण्याची आणि बाळाला मसाज करण्याची देखील अतिशय उत्तम संधी असते. अशा वेगवेगळ्या गोष्टी करून तुम्ही बाळाच्या अंघोळीच्या वेळेचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता. अंघोळ पूर्ण झाल्यावर बाळाचे अंग हलक्या हाताने पुसून कोरडे करा आणि त्यावर एखादी क्रीम लावा जेणेकरून त्यांच्या त्वचेवरील संरक्षक आवरण कायम तसेच राहील.
नवजात बाळाची काळजी घेताना पालकांकडून केल्या जाणाऱ्या तीन हमखास चुका कोणत्या?
१. फक्त पाण्याने अंघोळ घालणे. नवजात बाळांना अंघोळ घालताना बाळांसाठी खास बनवण्यात आलेले क्लिंजर वापरावे, अंघोळीनंतर क्रीम लावावे. मोहरीचे किंवा ऑलिव्ह तेल अजिबात वापरू नये.
२. बाळांसोबत असताना बरेच पालक त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतात. खरे तर पालकांचे संपूर्ण लक्ष बाळाकडे असायला हवे, बाळाचा आणि पालकांचा चेहरा समोरासमोर असायला हवा, बाळाची सर्व इंद्रिये जागृत होतील अशाप्रकारे त्याला खेळवले गेले पाहिजे.
३. दुर्दैवाने अनेक माता बाळाला अंगावर पाजणे लगेचच बंद करतात. योग्य मदत घेऊन आणि धीर बाळगून जवळपास सर्वच महिला आपल्या बाळांना अंगावरचे दूध पोटभर पाजू शकतात आणि बाहेरच्या दुधाचा पर्याय टाळू शकतात.
(-डॉ. पॉल होरोविट्झ, अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडिऍट्रिक्सचे (एफएएपी) फेलो व कॅलिफोर्निया, वेलेन्सीयामधील डिस्कवरी पेडिऍट्रिक्सचे सह-संस्थापक)