भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान संस्थेने रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट वापरून घरच्या घरी करोनाची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे प्रयोगशाळांवरचा ताण कमी होईल आणि चाचण्यांची संख्या वाढवण्यासही मदत होईल. या निर्णयाबरोबरच काही मार्गदर्शक सूचनाही जारी कऱण्यात आल्या आहेत. या चाचण्या कोण करु शकतं, कशा करायच्या याबद्दलची एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या याबद्दल सर्वकाही!
या कीटचा वापर कोण करु शकतं?
आयसीएमआर म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने हे स्पष्ट केलं आहे की फक्त लक्षणं असलेल्या व्यक्ती आणि करोनाबाधितांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीच फक्त या कीटने घरी चाचणी करु शकतात. या चाचण्यांचा अनावश्यक आणि अंदाधुंद वापर टाळण्याचा सल्लाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या चाचण्यांनंतर ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना करोनाबाधित म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यांना कोणत्याही इतर चाचण्याची गरज पडणार नाही. मात्र, लक्षणं असलेल्या ज्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांनी लगेचच आरटीपीसीआर टेस्ट करणं आवश्यक असल्याचं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास सदर रुग्णाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार त्वरीत गृहविलगीकरणात राहायचं आहे. लक्षणं असलेल्या ज्या व्यक्तींची ही चाचणी निगेटिव्ह येईल त्या सर्वांना संशयित करोना रुग्ण म्हणूनच ग्राह्य धरण्यात येईल.
हे कीट कसं वापरावं?
आयसीएमआरने आत्तापर्यंत पुण्यातल्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने तयार केलेलं कोविसेल्फ हेच कीट वापरण्याची परवानगी दिलेली आहे. या कीटमध्ये युजर मॅन्युअल, स्वॅब असलेलं पाउच, एक्स्ट्रॅक्शन ट्युब आणि टेस्ट कार्ड यांचा समावेश असणार आहे. चाचणी करण्यासाठी मायलॅब हे अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. त्यात दिलेली माहिती पूर्ण भरणं बंधनकारक असेल. आता स्वॅबच्या टोकाला स्पर्श न करता व्यक्तीला हा स्वॅब आपल्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन ते तीन सेंटिमीटरपर्यंत आत घालायचा आहे. त्यानंतर प्रत्येक नाकपुडीत घातल्यावर प्रत्येकी पाच वेळा हा स्वॅब फिरवायचा आहे. सोबत दिलेल्या ट्युबमध्ये हा स्वॅब घालून तो दिलेल्या जागेवरुन तोडायचा आहे आणि ट्युबचं झाकण बंद करायचं. त्यानंतर सोबत दिलेल्या टेस्ट कार्डवर योग्य त्या जागेमध्ये या ट्युबमधले दोन थेंब टाकायचे. आता १५ मिनिटांनंतर या चाचणीचा अहवाल समोर येईल. २० मिनिटांच्या कालावधीनंतर हा अहवाल ग्राह्य धरला जाणार नाही.
१५ मिनिटांनंतर तुम्हाला अॅपवरती एक नोटिफिकेशन येईल, ज्यात सांगितलं असेल की तुमचा अहवाल तयार आहे. त्यानंतर आपल्या टेस्ट कीटचा फोटो अॅप असलेल्या मोबाईलमधून काढायचा असल्याचंही आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे. मोबाईलमधला हा डाटा आयसीएमआरच्या कोविड टेस्टींग पोर्टलच्या सर्व्हरद्वारे घेतला जाईल आणि तिथेच हा डाटा सेव्ह करण्यात येईल. या सगळ्या प्रक्रियेत रुग्णांची ओळख कुठेही उघड केली जाणार नाही असंही आयसीएमआऱकडून सांगण्यात आलं आहे.