Beed’s Name History: ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. ११ तालुके असणाऱ्या या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे. कोकणातील लोकांची कुलदेवता असणारी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अंबाजोगाईची योगेश्वरी देवीचे मंदिर, एक हजार वर्ष जुने कंकाळेश्वर मंदिर, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे परळी वैजनाथाचे मंदिर, मन्मथस्वामी मंदिर, धारुरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला, हत्तीखाना, नायगावचे मयूर अभयारण्य अशी अनेक लोकप्रिय ठिकाणे बीड जिल्ह्यात पाहण्यासारखी आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे असे मातब्बर नेते या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले.बहुसंख्य साखर कारखान्यांना बीड जिल्हा ऊस तोड मजूर पुरवतो
बीड जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत येतो. पण, तुम्ही कधी विचार केला का बीड जिल्ह्याला बीड हे नाव कसं पडलं? आज आपण बीड या नावामागील इतिहास जाणून घेणार आहोत.
बीड हे नाव कसं पडलं?
बीड जिल्ह्याला पूर्वी शहराजवळ असलेल्या भरपूर पाण्यामुळे ‘भीर’ म्हणून ओळखले जात असे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भीर म्हणजे काय? एका आख्यायिकेनुसार, या शहराच्या काही भागांमध्ये खोलवर जमीन होती आणि त्यात पाणी साचलेले होते, त्यामुळे पाण्यासाठी पोषक असलेली जमीन या अर्थाने या शहराला भीर हे नाव देण्यात आले. पुढे कालांतराने भीर नावाचे बीडमध्ये रुपांतर झाले.
बीड या नावामागे आणखी एक आख्यायिका आहे. बीड या जिल्ह्याचा काही भाग बालाघाट डोंगर रागांपासून तयार झाला आहे, जो अजूनही डोंगराळ आहे. बालाघाट पर्वत रांगेच्या पायथ्याशी हे शहर असल्याने पर्वत रांगेतील हे बीळ (खोल भाग किंवा खड्डा) या अर्थाने या शहराचे नाव बीड असे पडले असावे.
पूर्वी या शहराला कोणत्या नावाने ओळखले जात असे?
बीडच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, वेद आणि पुराणात बीड जिल्ह्याचा उल्लेख ‘अस्माक’ असा केला आहे. पांडव काळात त्याला ‘चंपावती’ असं संबोधलं जाई. आंध्र, चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादवांनी यावर राज्य केलं. फारशी भाषेत ‘भीर’ म्हणजे पाणी, त्याचा अपभ्रंश होऊन बीड हे नाव मुघल काळात रूढ झालं.
बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकांपैकी एक जिल्हा होता. १९५६ साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठवाड्यात होता. १९६० ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर या जिल्ह्याचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला.