Matrimony Frauds : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकाला आयुष्यभर साथ देणारा आणि समजून घेणारा जोडीदार हवा असतो. हल्ली अनेक जण वधू-वर सूचक संकेतस्थळावर जोडीदार शोधण्यास अधिक पसंती देतात; पण जेव्हा संकेतस्थळावर तुम्ही जोडीदार शोधता तेव्हा अधिक काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या एका महिलेची वधू-वर सूचक संकेतस्थळावर एका व्यक्तीबरोबर ओळख झाली आणि नंतर त्या व्यक्तीकडून या महिलेची ५५ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली.
वधू-वर सूचक संकेतस्थळावर ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा संकेतस्थळावर जोडीदार शोधताना कोणती काळजी घ्यावी? याविषयी ‘लोकसत्ता’ने अनुरूप विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. गौरी कानिटकर आणि सायबर पोलीस ठाणे पुणे शहराचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्याशी संवाद साधला.
संकेतस्थळाची विश्वासार्हता तपासा
डॉ. गौरी कानिटकर : काही वधू-वर सूचक संकेतस्थळावर मोफत नोंदणी करण्याची सुविधा असते. पण, या संकेतस्थळावर फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा संकेतस्थळावर नाव नोंदणी खूप विचारपूर्वक करावी. वधू-वर सूचक स्थळांसाठी अनेक संकेतस्थळे काम करतात. अनेकदा त्यांची कार्यालयेसुद्धा नसतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही संकेतस्थळावर नाव नोंदणी करता, तेव्हा संकेतस्थळाची विश्वासार्हता तपासणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे.”
स्वत:विषयी माहिती सांगताना तारतम्य बाळगा
डॉ. गौरी कानिटकर : तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे प्रोफाईल आवडले, तर त्याने प्रोफाइलवर अपलोड केलेल्या माहितीची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचे शिक्षण कमी आहे; पण त्याने प्रोफाइलमध्ये तीन लाख पगार उल्लेख केला आहे, तर अशा वेळी शंका उपस्थित करणेसुद्धा गरजेचे आहे. वधू वर सूचक संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीबरोबर चॅट करताना स्वत:विषयी किती माहिती सांगायची, याचे तारतम्य बाळगणे खूप आवश्यक आहे.
समोरची व्यक्ती कोणत्या उद्देशाने संकेतस्थळावर आलेली आहे, हे तपासा
डॉ. गौरी कानिटकर : मुंबई येथील ज्या महिलेची ५५ लाखांची फसवणूक झाली, त्या महिलेकडे एवढे पैसे आहेत, हे त्या व्यक्तीला कसे कळले? तिने सांगितल्याशिवाय कळणे शक्य नाही. अशा संकेतस्थळावर बोलण्यामध्ये गुंतविण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. या लोकांचा वधू-वर सूचक संकेतस्थळावर लग्न करणे हा उद्देश नसतो. ते एका वेगळ्याच उद्देशासाठी संकेतस्थळावर येतात. अनेकदा बनावट अकाउंट उघडताना ते फोटोसुद्धा अपलोड करीत नाहीत आणि जर केले, तर ते खोटे फोटो असतात. त्यांनी दिलेला पत्ताही खोटाच असतो. त्यामुळे समोरची व्यक्ती कोणत्या उद्देशाने संकेतस्थळावर आलेली आहे, याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
संकेतस्थळांनी नाव नोंदणी करताना सरकारमान्य ओळखपत्राचा पुरावा मागावा
डॉ. गौरी कानिटकर : वधू-वर सूचक संकेतस्थळांनीसुद्धा बनावट अकाऊंट टाळता येईल याची काळजी घ्यावी. संकेतस्थळाने ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्याची सुविधासुद्धा द्यावी. ज्यामुळे विश्वासार्हता निर्माण होईल. सरकारमान्य ओळखपत्र पुरावा म्हणून संकेतस्थळावर अपलोड करणे खूप आवश्यक आहे. अनुरूप या संस्थेमध्ये आम्ही नाव नोंदणी करताना चार प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून मागतो. १. ओळखपत्र, २. पदवी प्रमाणपत्र, ३. सॅलरी स्लिप, ४. घरचा पत्ता. ‘अनुरूप’ने आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लग्ने जमवली आहेत. या संस्थेला ४९ वर्षे झाली आणि लोकांना आमच्याबद्दल विश्वास आहे. इतर संकेतस्थळांनीसुद्धा अशी माहिती विचारली, तर फसवणुकीला आळा घालता येईल.
डेटिंग अॅप्स व मॅट्रिमोनियल अॅप्स
डॉ. गौरी कानिटकर : अनेकदा तरुण मुले डेटिंग संकेतस्थळे व वधू-वर सूचक संकेतस्थळे यांतील फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. डेटिंग संकेतस्थळावर तरुण-तरुणी खूप जास्त सक्रिय असतात. वधू-वर सूचक स्थळांच्या संकेतस्थळांवर पालकांची उपस्थिती असते; पण डेटिंग संकेतस्थळावर पालक नसतात. अनेकदा पालकांना डेटिंग संकेतस्थळाचे नावसुद्धा माहिती नसते. जेव्हा आपण लग्न करतो, तेव्हा पालकांना बरोबर घ्यावे. कारण- पालकांचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरतो; पण याचा अर्थ असा नाही की, सर्व काही पालकांनी करावे आणि मुलांनी शांत बसावे.
संकेतस्थळावर नाव नोंदणी करताना हेतू विसरू नका
डॉ. गौरी कानिटकर : संकेतस्थळावर नाव नोंदणी करताना हेतू स्पष्ट पाहिजे. प्रथमदर्शनी भूलू नका. समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताना तुमचा हेतू विसरू नका. समोरची व्यक्ती गोड बोलून तुमच्याकडून माहिती काढून घेत आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्याबरोबर समोरची व्यक्ती गोड बोलत आहे म्हणून त्यात वाहवत जाणे चुकीचे आहे. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. लग्न करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांकडून समुपदेशनसुद्धा घेऊ शकता.
वधू-वर सूचक संकेतस्थळावर फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते?
पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे : विवाह संस्थांच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करताना ते संकेतस्थळ अधिकृत आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. म्हणजेच त्या संकेतस्थळाची विश्वासार्हता पटली, तर त्यावर येणारी स्थळे ही फसवी नसणार याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
नाव नोंदणी करताना तुम्ही तुमचा फोटो, बायोडाटा अपलोड करता आणि तुमची समोरच्याकडून काय अपेक्षा आहे, याविषयी सांगता. मग समोरची व्यक्ती तुमच्या अपेक्षा बघून त्याप्रमाणे तुमच्याबरोबर वागू शकते. अपेक्षा पूर्ण करण्याचे खोटे आश्वासन देऊ शकते. काही लोक तुमचे आर्थिक स्टेटस पाहून बोगस प्रोफाइल तयार करू शकतात आणि तुमच्याशी संवाद साधू शकतात अशा प्रकारे तुमची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.
पैशाची मागणी करणाऱ्या समोरच्या व्यक्तीचा हेतू समजून घेणे गरजेचे
पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे : संकेतस्थळावरील प्रोफाइल खरे आहे का का हे जाणून घेण्यासाठी ती व्यक्ती खरी आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती तुमच्याकडे पैशाची मागणी करते, तेव्हा लगेच त्या व्यक्तीचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. वर-वधू सूचक संकेतस्थळाचा उद्देश काय असतो? योग्य वर किंवा वधू भेटणे, योग्य जोडीदार भेटणे. जोडीदाराकडून हीच अपेक्षा असते की, त्याने तुम्हाला सांभाळून घेतले पाहिजे आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे. पण, तीच व्यक्ती जर तुमच्याशी जवळीक साधते आणि नंतर पैशाची मागणी करते, तेव्हा हे लक्षात घेणे गरजेचे आहे की ती योग्य व्यक्ती नाही. जिथे नातेसंबंध जुळवायचे असतात, तिथे पैशांच्या मागणीचा संबंधच येत नाही.
समोरच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून
पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे : इंटरनेटचे युग आहे. पण आपली फसवणूक होऊ नये या दृष्टीने काळजी घ्यावी. अनेकदा आपल्यावर अवलंबून असते की, आपण समोरच्यावर किती विश्वास ठेवतो. माझा तरुणाईला सल्ला आहे की, भावनिक गोष्टीला बळी पडू नका. ऑनलाइन संकेतस्थळावर डोके शांत ठेवून जोडीदार निवडा.