भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. देशातील क्वचितच असा भाग असेल की ज्यातून रेल्वेमार्ग जात नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला रेल्वे रुळांवरून ट्रेन धावताना दिसतात. आज देशातील सर्वसामान्य माणूसही प्रवासासाठी फक्त ट्रेनचा वापर करतो. भारतीय रेल्वेमधील ट्रेन्समध्ये अशा काही सुविधा आहेत, ज्या तुम्हाला इतर सार्वजनिक वाहतुकीत सापडणार नाहीत.
ट्रेनमध्ये सर्वात महत्वाची समजली जाणारी सुविधा म्हणजे टॉयलेट. लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना सर्वात मोठी भेडसावणारी समस्या असते ती म्हणजे टॉयलेटची. बसने प्रवास करताना प्रवाशांना टॉयलेटसाठी हॉटेल किंवा मोकळ्या जागेत जावे लागते. पण, ट्रेनच्या बाबतीत तसे होत नाही. कोणतीही व्यक्ती ट्रेनमधील वॉशरूममध्ये जाऊन आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर करू शकतो. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनमधून प्रवास करताना वॉशरूमला कुठे आणि कसे जायचे याची चिंता नसते. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, ट्रेनच्या टॉललेटमधील घाण कशी साफ केली जाते? चला तर मग जाणून घेऊ…
ट्रेनच्या टॉयलेटमधील घाण कुठे जाते?
यापूर्वी ट्रेनच्या टॉयलेटच्या खाली असलेले चेंबर्स ओपन होते. म्हणजेच टॉयलेटमध्ये बसवलेल्या टॉयलेट सीटचा कमोड ओपन होता. यामुळे एखाद्या प्रवाशाने टॉयलेटमध्ये लघवी किंवा विष्ठा केली तर ती थेट रुळांवर पडायची. यामुळे प्रवाशांनाही नेहमी ट्रेन चालू असताना टॉयलेटमध्ये जाण्याची सूचना केली जायची. जेणेकरून विष्ठा आणि लघवी रुळांवर विखुरली जाईल व रेल्वेस्थानक स्वच्छ राहतील; पण तरीही यामुळे ट्रॅक मात्र अस्वच्छ राहत होते.
यावर रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांना वारंवार ट्रेन सुरू असतानाच टॉयलेट वापरण्याच्या सूचना केल्या जात होत्या. पण, प्रवाशांनी याकडे दुर्लक्ष करत ट्रेन उभी असतानाच टॉयलेटचा वापर करणे सुरू ठेवले. यामुळे काही स्थानके स्वच्छ, तर काही अस्वच्छ राहू लागली. यानंतर सरकारने ओपन डिस्चार्ज सिस्टीम या प्रणालीवर बंदी घातली. यामुळे आता प्रश्न असा पडतो की, ट्रेनमधील टॉयलेट आता कसे स्वच्छ ठेवले जातात?
ट्रेनमधील टॉयलेट कसे असतात?
खरं तर, आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत. जे डीआरडीओने तयार केले आहेत आणि त्यांच्याच मदतीने ते ट्रेनमध्ये बसवण्यात आले आहेत. जेव्हा एखादा प्रवासी या टॉयलेटचा वापर करतो, तेव्हा त्याची विष्ठा एका चेंबरमध्ये पोहोचते, जिथे उपस्थित बॅक्टेरिया त्यांचे मुख्य काम करतात. हे बॅक्टेरिया विष्ठा पाण्यात रूपांतरित करतात, यातून जो घन भाग उरतो तो वासाविना वेगळ्या चेंबरमध्ये पाठविला जातो. रेल्वे या उरलेल्या घन भागाची विल्हेवाट लागते. तसेच मलमूत्रातून पाण्यात रुपांतरित झालेला भाग पुन्हा वापरासाठी घेतला जातो. याचा अर्थ हे पाणी पुन्हा वापरले जाते. अशा प्रकारे टॉयलेटमधील मानवी विष्ठेची विल्हेवाट लावली जाते.