भारतात नुकतीच क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पार पडली. भारतीय संघानं यंदाच्या विश्वचषकात केलेल्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागल्यामुळे क्रिकेटपटू व क्रिकेट चाहत्यांमध्ये काहीशी निराशा पसरली असली, तरी या स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर सगळेच समाधान व्यक्त करत आहेत. या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज ‘टाईम आऊट’ झाल्यामुळे आयसीसीच्या नियमावलीची मोठी चर्चा पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे आता आयसीसीकडून लागू करण्यात येणाऱ्य आणखी एका नियमाची चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरुष क्रिकेट सामन्यांमध्ये लागू होणार नियम

आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये स्टॉप क्लॉकसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या पाच महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये आयसीसीकडून या नियमाच्या परिणामांचा आढावा घेण्यात येईल. त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यास कायमस्वरूपी या नियमाचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंदर्भातील नियमावलीमध्ये करण्यात येईल. या पाच महिन्यांमध्ये आयसीसीकडून भरवण्यात येणाऱ्या पुरुष एकदिवसीय व टी-२० सामन्यांमध्ये हा नियम लागू करण्यात येईल.

Stop Clock चं गोलंदाजांवर बंधन

आयसीसीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, आता पुरुष एकदिवसीय व टी २० सामन्यादरम्यान स्टॉप क्लॉक अर्थात वेळमर्यादा दर्शवणारं घड्याळ लावण्यात येईल. गोलंदाजाचं षटक टाकून झाल्यानंतर लगेच हे घड्याळ सुरू होईल. पुढचा गोलंदाज पुढचं षटक टाकण्यासाठी येईपर्यंत हे घड्याळ चालू राहील. पुढचा गोलंदाज षटक टाकण्यासाठी ६० सेकंदांच्या आत तयार झाला नाही, तर त्याची नोंद करण्यात येईल. असा प्रकार तीन वेळा घडला, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा अतिरिक्त देण्यात येतील.

क्रीझवर आलेल्या मॅथ्यूजला खेळण्याआधीच अम्पायरनं दिलं बाद! काय आहे Time Out चा नियम?

आयसीसीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. मात्र, अशी बाब एकाच डावात वारंवार घडल्यास त्यावर काय कारवाई किंवा निर्णय असेल, याविषयी निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही.

टाईम आऊट नियमासाठीही वेळेचं बंधन!

दरम्यान, गोलंदाजाप्रमाणेच फलंदाजांसाठी आधीपासूनच वेळेचं बंधन असणारा नियम आयसीसीच्या नियमावलीमध्ये आहे. त्यानुसार, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज २ मिनिटांच्या आत मैदानात येऊन फलंदाजीसाठी तयार असायला हवा. तसे न झाल्यास त्याला टाईम आऊट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज याला याच नियमाच्या आधारे पंचांनी टाईम आऊट दिलं होतं.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc stop clock rule to be implemented in odi and t 20 matches pmw