वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे.  हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. यंदा २४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> वटपौर्णिमा विशेष : उपवासाला काय खावे आणि काय टाळावे?

मात्र यामागे काही शास्त्रीय कारणेही सांगितली जातात. वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते. याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते असेही म्हणतात. वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षांसाठी जगते त्याचप्रमाणे आपला पतीही दिर्घायुषी व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असाही समज आहे.

पौराणिक कथा…

अनेक वर्षापूर्वी अश्वपती नावाचा राजाच्या आपल्या सावित्री या मुलीला तिचा पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्र अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. त्यावेळी सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा एका अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत केले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने सावित्रीला परत जाण्याची विनंती केली. पण तिने पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तु म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात असे म्हटले जाते.

पोर्णिमा कधी सुरु होणार आणि संपणार?

वटपोर्णिमा २४ जून २०२१

पोर्णिमा प्रारंभ : २४ जून २०२१ रोजी पहाटे ३.३२ पासून

पोर्णिमा समाप्ती : २५ जून २०२१ रोजी रात्रौ १२.०९ वाजता

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of vat purnima in marathi scsg