बैठ्या खेळांमध्ये जोड पत्ते, मेंढी कोट, तीन पत्ते, पाच-तीन-दोन अशा पत्त्यांशी संबंधित खेळांचा समावेश होतो. पत्त्याच्या एका कॅटमध्ये बदाम, इस्पिक, चौकट व किलावर या चिन्हांचे प्रत्येकी १३ म्हणजेच एकूण ५२ पत्ते असतात. यातील बदाम, चौकट पत्ते लाल, तर इस्पिक, किलावर हे पत्ते काळ्या रंगाचे असतात. एक्का, दुर्री, तिर्री ते दश्शीपर्यंतचे दहा; राजा, राणी आणि गुलाम असे मिळून १३ पत्ते अस्तित्त्वात आहेत. या पत्त्यांव्यतिरिक्त प्रत्येक कॅटमध्ये दोन जोकर असतात. पत्त्यांच्या गणितामध्ये राजाच्या पानाला खास महत्त्व असते. एका कॅटमध्ये राजाची चार पाने असतात. यातील बदामचा राजा हा खूप खास असतो. त्याच्याबद्दलची माहिती फार कमी लोकांना ठाऊक आहे. हा राजा इतर तिघांपेक्षा थोडा वेगळा दिसतो. इतर राजांप्रमाणे त्याला मिश्या नसतात.
बदामच्या राजाला मिशी का नसते या प्रश्नाची अनेक कारणे आहेत. ‘द गार्डियन’ (The guardian) या ब्रिटनमधील वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली होती. त्यांच्या वृत्तानुसार, पूर्वी बदामच्या राजाला मिशी होती. पुढे पत्त्यांची पुनर्रचना करताना डिझायनर बदामच्या राजांच्या मिश्या काढायला विसरला. काही कारणांमुळे त्यामध्ये बदलही केले गेले नाही आणि मिशी नसलेल्या बदामच्या राजाच्या पत्त्यांचा वापर तसाच सुरु राहिला. पत्त्यांचा खेळ खेळायला चौदाव्या शतकात युरोप खंडामध्ये सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळामध्ये पत्त्यांची संख्या, रंग वगैरे गोष्टीबाबत निश्चिती नव्हती. हळूहळू हा खेळ युरोपातील सर्व देशांमध्ये लोकप्रिय झाल्याने त्याबद्दल नियम ठरवण्यात आले. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या पत्त्यांच्या रचनेमध्ये काही निर्णायक बदल करण्यात आले. काहींच्या मते, अठराव्या शतकामध्ये पत्त्यांची पुनर्रचना केली गेली.
काहींच्या मते, पत्त्यांमधील राजांची पानं ही युरोप खंडातील चार महान राजांवरुन तयार करण्यात आली आहेत. यातील इस्पिकचा राजा हा इस्रायलचा राजा डेव्हिड आहे. किलावर पानामध्ये असणारा मॅसेडोनियन राजा सिकंदर आहे. रोमन राजा सीझर ऑगस्टसचे चित्र चौकटच्या राजाच्या पत्त्यावर आहे. तर बदामचा राजा हा फ्रान्सचा शार्लेमेन राजा आहे असे म्हटले जाते. एका जुन्या गोष्टीनुसार, ही राजाची पानं म्हणजे युरोपातील एका राजाची चार मुलं आहेत. त्यातील एका मुलाला मिशी नव्हती. तोच मुलगा बदामचा राजा आहे.
आणखी वाचा – सार्वजनिक ठिकाणचे WiFi वापरताय? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकते नुकसान
बदामच्या राजाला आत्महत्या करणारा राजा असेही म्हटले जाते. जर त्या पत्त्याच्या डिझाइनकडे नीट लक्ष दिल्यास बदामच्या राजाची तलवार त्याच्याच डोक्यात घुसते हे पाहायला मिळते. पत्त्यांमध्ये पुनर्रचना करत असताना ही मिशीप्रमाणे तलवारीबाबत चूक झाली होती अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही चूक काही ठिकाणी सुधारण्यात आली आहे.