In this Tamil Nadu village shoes are banned: तुम्हाला माहीत आहे का, भारतात असं एक गाव आहे जिथे शूज, चप्पल किंवा स्लीपरदेखील घालणं बॅन आहे? आणि यामुळेच त्या गावातली लोकं नेहमीच अनवाणी चालतात? पण, यामागचं नेमकं कारण काय? चला तर मग आजच्या या लेखातून आपण यामागचं खरं कारण जाणून घेऊयात.
गावकरी चालतात अनवाणी
तमिळनाडू येथे वसलेलं आणि चेन्नईपासून ४५० किलोमीटर दूर असलेलं या गावाचं नाव आहे ‘अंदमान.’ न्यूज १८ च्या माहितीनुसार त्यावेळी या गावात सुमारे १३० कुटुंबे राहत होती. कुटुंबातील लोकं शेती तसेच शेतात मजुरी करत होते.
अहवालानुसार, या गावात फक्त वृद्ध किंवा आजारी लोक चप्पल घालून फिरतात, अन्यथा कोणीही चप्पल घालत नाही. रणरणत्या उन्हात काही लोक चप्पल घालतात, जेणेकरून त्यांच्या पायाचे रक्षण होईल. तर शाळकरी मुलंदेखील शूज किंवा चप्पल न घालता शाळेत जातात.
अनवाणी चालण्यामागे आहे ‘हे’ कारण
गावात अनवाणी चालण्यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मुथ्यलम्मा (Muthyalamma) नावाची देवी आपल्या गावाचे रक्षण करते. मार्च-एप्रिलमध्ये गावकरी या देवीची पूजा करतात आणि तीन दिवस तिथे उत्सवाचे आयोजन केले जाते. देवीच्या सन्मानार्थ या गावी लोक शूज आणि चप्पल घालत नाहीत. ज्याप्रमाणे लोक चप्पल घालून मंदिरात जात नाहीत, त्याचप्रमाणे या गावातील लोक या गावाला मंदिर मानतात आणि पायात काहीही न घालता इथे या धरतीवर चालतात. यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे गावकरी वर्षानुवर्षे ही प्रथा सुरू ठेवत आहेत.
हेही वाचा… सर्वाधिक लोकांची पसंती NOTAलाच का? २०२४च्या लोकसभा निवडणुकीत किती लोकांनी NOTA पर्याय निवडला?
गावाबाहेरील लोकांना चप्पल घालण्यास बंदी
तसंच गावात जर कोणी बाहेरून व्यक्ती आली, ज्याला या प्रथेबद्दल ठाऊक नसेल तर त्याला आधी या प्रथेबद्दल सांगितले जाते. जर ती व्यक्ती या प्रथेशी सहमत नसेल तर त्या व्यक्तीला याचे पालन करण्यास भाग पाडले जाते.
जो कोणी ही प्रथा करण्यास नकार देईल त्याला एक भयंकर ताप येईल जो गावात पसरेल आणि सर्वांचा जीव घेईल, अशी जुनी धारणा या गावात अजूनही टिकून आहे. या कारणास्तव या गावातील गावकरी जेथे जातात तेथे शूज किंवा चप्पल घालण्यास नकार देतात आणि अनवाणी चालतात.