परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्वाचा असतो हे सर्वांना चांगले ठाऊक आहे, त्यामुळे इतर महत्वाच्या कागदपत्रांप्रमाणे पासपोर्ट देखील जपून ठेवावा लागतो. परदेशातील प्रवासासाठी पासपोर्ट महत्वाचा भाग आहेत पण सुरक्षेच्या दृष्टीनेही पासपोर्ट असणे खूप महत्वाचे आहे. यामुळे पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया देखील अत्यंत अवघड आहे. पण अनेकदा पासपोर्ट आपल्या किंवा इतरांच्या चुकीमुळे हरवतो किंवा खराब होतो. अशावेळी काय करावे ते सुचत नाही. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला पासपोर्ट हरवला किंवा खराब झाला तर तो पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
पासपोर्ट खराब झाल्यास किंवा हरवल्यास काय करावे?
१) जर तुमचा पासपोर्ट परदेशात हरवला असेल तर तुम्ही ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशन आणि पासपोर्ट ऑफिस किंवा भारतीय मिशनला तक्रार करावी. याशिवाय तुम्ही पासपोर्टच्या ‘री-इश्यू’साठीही अर्ज करू शकता.
२) पासपोर्ट रि- इश्यू करण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असायला हवीत, जी तुम्हाला अर्जासोबत सादर करावी लागतील.
पासपोर्ट पुन्हा बनवण्यासाठी अर्ज कसा करावा?
जर तुमचा पासपोर्ट हरवला किंवा खराब झाला तर तुम्हाला पासपोर्ट कार्यालय डुप्लिकेट पासपोर्ट देत नाही. तुम्हाला नवीन क्रमांकासह पासपोर्ट दिला जातो, ज्याची नवीन वैधता असेल. अधिक माहितीसाठी अर्जदार हरवलेले/खराब झालेले पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचा संदर्भ घेऊ शकतात.
नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करावे?
१) प्रथम जुन्या पासपोर्टची एक कॉपी घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा.
२) जर तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर करायचा नसेल तर तुम्ही जवळच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात (RPO) अपॉइंटमेंट बुक करा.
३) यावेळी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे, ज्यात स्थानिक रहिवासी पुरावा, आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र यासारख्या आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.
४) अर्जदार अधिकृत पासपोर्ट सेवा वेबसाइटद्वारे अर्ज प्रक्रिया ऑनलाइन देखील बुक करू शकतात.
५) यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड आयडीने लॉग इन करा किंवा लवकर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही ‘तत्काळ’ ऑप्शन देखील निवडू शकता.
६) आता तुमच्या सोयीनुसार पेमेंट आणि अपॉइंटमेंटची तारीख निवडा.
७) महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पासपोर्ट हरवल्यानंतर तो पुन्हा मिळवण्यासाठी तुमच्याकडून प्रोसेसिंग फी घेतली जाते.
८) नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी, पासपोर्ट जारी करण्याच्या नियमित प्रक्रियेचे पालन करावे लागेल.