परदेशात जाण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्र म्हणजे पासपोर्ट. आत्तापर्यंत हा पासपोर्ट काढण्यासाठी लाख खटपटी कराव्या लागत होत्या. पासपोर्ट ऑफिसला जावं लागत होतं. बरं, ते आपल्या शहरात असेल तर ठीक नाहीतर दुसऱ्या शहरात जाणं भाग होतं. पण आता ही सगळी कटकट दूर होणार आहे. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता पासपोर्ट मिळवता येणार आहे.
इंडिया पोस्टनेच एका ट्विटद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आता आपण जवळच्या पोस्ट ऑफिस सीएससी काउंटरवर पासपोर्टसाठी नोंदणी आणि अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या. ”
Passindindia.gov.in नुसार “पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे ह्या पासपोर्ट कार्यालयांच्या विस्तारित शाखा आहेत आणि पासपोर्ट देण्याशी संबंधित फ्रंट-एंड सेवा प्रदान करतात. या केंद्रांमध्ये टोकन जारी करण्यापासून ते पासपोर्ट देण्यासाठी अर्ज करण्यापर्यंतची प्रक्रिया समाविष्ट आहे.
अब अपने नज़दीकी डाकघर के सीएससी काउंटर पर पासपोर्ट के लिए पंजीकरण और आवेदन करना सरल हो गया है। अधिक जानकारी के लिए, नज़दीकी डाकघर पर जाएँ। #AapkaDostIndiaPost pic.twitter.com/iHK0oa9lKn
— India Post (@IndiaPostOffice) July 24, 2021
कसा कराल अर्ज?
पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी आपण नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला पासपोर्ट तयार करण्यासाठीचं ऑनलाईन शुल्क आणि फॉर्म जमा करावा लागतो. असे केल्यावर तुम्हाला एक तारीख सांगितली जाईल. त्या दिवशी आपल्याला निवडलेल्या कागदपत्रांसह जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल.
कोणती कागदपत्रं लागतील?
पासपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला, दहावी-बारावीचं मार्कशीट, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड आणि नोटरीद्वारे केलेले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे लागतील. हे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल.
पडताळणी रेटिना स्कॅनिंगद्वारे केली जाणार
आपली सर्व कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये नेल्यानंतर त्याची सत्यता तपासली जाईल. कागदपत्रे योग्य आढळल्यास प्रक्रिया पुढे जाईल. या भेटीदरम्यान अर्जदाराचे फिंगर प्रिंट आणि डोळ्यातील पडदा स्कॅन केला जाईल. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेस 15 दिवस लागतील. यानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळेल.