Free Train In India : भारतातील कोणत्याही रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांकडे सर्वात आधी तिकीट असणं फार गरजेचे आहे. तुम्ही ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास दंड भरावा लागतो. पण कल्पना करा, तुम्ही विनातिकीट ट्रेनमधून प्रवास करू शकत असाल तर आणि तेही कायदेशीररित्या. होय, तुमच्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे. भारतात अशी ट्रेन आहे, ज्या ट्रेनमधून प्रवासी विनातिकीट अगदी मोफत प्रवास करू शकतात, त्यामुळे तुम्हाला या ट्रेनमध्ये बसण्यासाठी ना तिकिटाची गरज भासते ना टीटीच्या कारवाईची भीती. तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा तुम्ही या ट्रेनमधून मोफत प्रवास करू शकता.
७५ वर्षांपासून मोफत प्रवासाची संधी
मोफत प्रवासाची संधी देणारी ही ट्रेन पंजाब आणि हिमाचल प्रदेशदरम्यान धावते. जी भाकरा-नांगल ट्रेन म्हणून ओळखली जाते. ही ट्रेन गेल्या ७५ वर्षांपासून कोणत्याही भाड्याशिवाय १३ किलोमीटरचा प्रवास करत आहे. या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एक पैसाही आकारला जात नाही.
तीन बोगदे आणि सहा स्थानकांमधून जाते ही ट्रेन
भाकरा-नांगल ट्रेनचा मार्ग अतिशय सुंदर आहे. ही ट्रेन सतलज नदी ओलांडून शिवालिक टेकड्यांमधून जाते. प्रवासादरम्यान ही ट्रेन तीन बोगदे आणि सहा स्थानकांमधून जाते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा एक अनोखा अनुभव घेता येतो.
लाकडी कोच आणि ऐतिहासिक खुर्च्या
या ट्रेनमध्ये फक्त तीन लाकडी कोच आहेत. विशेष म्हणजे या कोचमधील खुर्च्या ब्रिटीशकालीन आहेत, ज्या आजही जतन करून ठेवल्या आहेत. ही ट्रेन सुरू झाली तेव्हा ती वाफेच्या इंजिनने चालवली जात होती. त्यात १९५३ मध्ये डिझेल इंजिन बसवण्यात आले होते आणि तेव्हापासून ती फकत डिझेल इंजिनवर धावते.
ट्रेनचे भाकरा-नांगल धरणाशी जोडले नाते
१९४८ मध्ये भाकरा-नांगल धरणाचे बांधकाम सुरू झाले तेव्हा ही ट्रेन मजूर आणि बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी चालवली जात होती. ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या अंतर्गत नसून भारका इंटरेस्ट मॅनेजमेंट बोर्डाच्या व्यवस्थापनाखाली आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यावर ही ट्रेन थांबविण्याऐवजी ती पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दररोज ८०० प्रवासी करतात प्रवास
आजही भाकरा-नांगल ट्रेनमधून दररोज सुमारे ८०० लोक प्रवास करतात. ही ट्रेन केवळ पर्यटकांना आकर्षित करत नाही, तर स्थानिक लोकही या प्रवासाचा लाभ घेतात.
पर्यटकांसाठी विशेष आकर्षण
हिमाचल प्रदेश आणि पंजाबचे निसर्गसौंदर्य बघू इच्छिणाऱ्यांसाठी ही ट्रेन एक उत्तम पर्याय आहे. सतलज नदी आणि शिवालिक टेकड्यांदरम्यान या ट्रेनने प्रवास करणे एखाद्या रोमांचक अनुभवापेक्षा कमी नाही.
इतिहास आणि परंपरेची झलक
भाकरा-नांगल ट्रेन ही केवळ वाहतुकीचे साधन नसून आपल्या देशाच्या ऐतिहासिक वारशाचे जिवंत उदाहरण आहे. या ट्रेनचे कोच, इंजिन आणि मार्ग सर्व मिळून त्या काळाची आठवण करून देतात, जेव्हा देशात मोठी धरणे आणि प्रकल्प सुरू होत होते.
तुम्हालाही विनातिकीट रेल्वे प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि सुंदर निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर भाकरा-नांगल ट्रेन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. इथे प्रवास करताना तुम्हाला ना तिकीट बुक करण्याचा त्रास होणार, ना TTE ची भीती. आयुष्यभर स्मरणात राहील असा हा अनुभव असेल.