Indian Railway dynamic fare : भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलं आहे. महत्त्वाच्या शहरांमधून गावोगावी जाण्यासाठी सामान्य लोक रेल्वेने प्रवास करतात. एकंदर रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रवासादरम्यानचे अनेक नियम बदलण्यात आले आहेत. विशेषत: ऑनलाइन आरक्षण करताना तिकिटांवर विविध चार्जेस देखील घेतले जातात. प्रवासी कोणत्या श्रेणीतून प्रवास करणार यावर तिकीटदर अवलंबून असतात. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या रेल्वे सेवांमध्ये डायनॅमिक तिकीट दर आकारणी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवासी रेल्वे तिकीट बूक करताना अनेकदा सुरुवातीला वेगळे तिकीट दर दाखवले जातात. त्यानंतर मूळ आरक्षण करताना तिकिटांची एकूण रक्कम वेगळी दाखवली जाते. यादरम्यान आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर डायनॅमिक दर लागू होतील असा संदेश येतो. अनेकांना ही डायनॅमिक दरप्रणाली म्हणजे काय याबद्दल असंख्य प्रश्न पडतात. याबद्दल जाणून घेऊयात…

दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात परंतु, काही विशेष प्रसंगी, सणवाराला रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. अशावेळी डायनॅमिक दरप्रणालींमुळे रेल्वे तिकिटांचे दर खूप जास्त वाढतात. अनेकदा रेल्वे भाडं आणि विमानाचं तिकीट यात फारसा फरक राहत नाही. अनेकदा डायनॅमिक दरप्रणालीमुळे मूळ तिकिटांच्या दरात ५० टक्क्यांपर्यंत वाढ होते. काही वर्षांपूर्वी रेल्वेने आर्थिक कारणांतून डायनॅमिक तिकीट दरवाढ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

डायनॅमिक दरप्रणाली म्हणजे काय? ( Dynamic Fare )

  • डायनॅमिक दरप्रणाली म्हणजेच सतत बदलत राहणारी तिकिटांची रक्कम. तिकिट बुकिंगला जितके कमी दिवस तितकं भाडं जास्त…याउलट प्रवासी जेवढ्या आधी तिकीटं बुक करतील तेवढे तिकिटांचे दर स्वस्त असतील.
  • डायनॅमिक तिकीट प्रणाली फक्त राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या प्रीमियम रेल्वे गाड्यांना लागू आहे.
  • एखाद्या रेल्वेतील १० टक्के आसनं बूक झाल्यानंतर उर्वरित आसनांची तिकीटं बूक करताना दरांमध्ये १० टक्क्यांनी वाढ होते. यालाच डायनॅमिक दरप्रणाली म्हणतात.
  • उदाहरणार्थ, राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या गाड्यांमधलं एक तिकीट २०० रुपये असेल, तर संबंधित ट्रेनमधली १० टक्के आसनं बूक झाल्यावर तिकीटदर २२० रुपये होतील.
  • रेल्वे डायनॅमिक फेअर सिस्टीम ही अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार तिकिटांचं भाडं ठरवलं जातं. ट्रेनमधली ७० ते ८० टक्के आसनं बूक झाल्यावर तिकिटदरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. मात्र, डायनॅमिक प्रणालीनुसार सतत बदलणारे तिकीट दर असले तरीही, ही वाढ एका विहित मर्यादेतच करण्यात येते.

दरम्यान, फर्स्ट क्लास ( I टिअर एसी ) आणि एक्झिक्यूटिव्ह क्लासमधून ( EC ) प्रवास करताना डायनॅमिक तिकीट दर लागू होत नाहीत. कारण, आधीपासूनच या दोन श्रेणींचे तिकीट दर तुलनेने जास्त असतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway dynamic fare in premium trains what is the system know in details sva 00