ट्रेनमधून प्रवास करताना खाण्यापिण्याचा आनंद काही औरच असतो. यात जर तुम्ही मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबीयांबरोबर ट्रेनने प्रवास करत असाल तर यावेळी ट्रेनमध्ये मिळणारे पदार्थ एकत्र मिळून खाण्याची मज्जा फार वेगळी असते. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात, यातील अनेक जण प्रवासादरम्यान खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ घरूनच घेऊन जातात. पण, असे अनेक प्रवासी आहेत जे पँट्री कार आणि रेल्वेस्थानकावर उपलब्ध असलेल्या पदार्थांचा आनंद घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, देशातील अशी अनेक रेल्वेस्थानकं आहेत जी वेगवेगळ्या खाद्यपदार्थ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
यामुळे जेव्हा कधी या स्थानकांची नावं घेतली जातात, तेव्हा तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचीही नावं आपोआप ओठांवर येतात. त्यामुळे आजसुद्धा विविध खाद्यपदार्थ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रेल्वेस्थानकांबद्दल जाणून घेणार आहोत.
१) जालंधर
पंजाबचे नाव घेताच पराठा, नान, छोले आण लस्सीची आठवण येते. यामुळे जर तुम्ही पंजाबला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत असाल, तर जालंधर रेल्वेस्थानकावर मिळणारे छोले भटुरे नक्कीच खाऊन पाहा, कारण इथे मिळणारे छोले भटुरे स्वादिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहेत.
२) अजमेर
जर तुम्ही राजस्थानमधील अजमेरमध्ये पर्यटनासाठी जाणार असाल, तर तुम्ही अजमेर रेल्वेस्थानकावर मिळणारे कढी-कचोरी नक्की खाऊन पाहा. कारण येथील कढी-कचोरी खूप फेमस आहे.
३) टूंडला
तुम्ही दिल्लीहून कानपूरला ट्रेनने जात असाल तर त्यादरम्यान तुम्हाला टूंडला स्टेशन लागेल, तुमची ट्रेन इथे काहीवेळ थांबणार असेल, तर तुम्ही येथील टिक्की चाखायला विसरू नका, टुंडला रेल्वेस्थानकावर मिळणाऱ्या टिक्कीची चव इतकी भारी असते की तुम्ही बोटं चाटत बसाल.
४) रतलाम
मध्य आणि उत्तर भारतात नाश्त्यामध्ये कांदा पोहे खूप लोकप्रिय आहेत. विशेषत: मध्य प्रदेशातील बहुतांश लोकांची सकाळची सुरुवात कांदे पोह्याने होते. यामुळे तुम्ही मध्य प्रदेशला जाणार असाल आणि तेथील रतलाम रेल्वेस्थानकावर उतरणार असाल, तर येथील कांदा पोह्याचा जरूर आस्वाद घ्या. कारण या रेल्वेस्थानकावरील कांदे पोहे प्रवाशांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या अनेक ट्रेन रतलाममधून जातात. यामुळे तुम्हीही या मार्गावरून प्रवास करत असाल, तर कांदा पोहे खायला विसरू नका.
५) अबू रोड स्टेशन
गोड रबडी खाण्यात एक वेगळाच आनंद असतो. अनेकांना रबडी खायला आवडतेही. त्यामुळे तुम्हीही रबडीप्रेमी असाल तर राजस्थानच्या अबू रोड स्टेशनवर जाण्याचा योग आला तर तेथील रबडी चाखायला विसरू नका. तुम्ही इथली थंड आणि मऊ रबडी चाखली तर त्याची चव आयुष्यभर विसरणार नाही.
६) पाटना
बिहारला जाऊन लिठ्ठी चोखा खाल्ला नाही तर काय खाल्ले? कारण लिठ्ठी चोखा हा पदार्थ बिहारमधील एक पारंपरिक पदार्थ आहे. त्यामुळे जर तुम्ही राजधानी पाटना रेल्वेस्थानकावर थांबलात तर लिठ्ठी चोखाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
७) कर्जत
वडा पाव हा देशातच नाही जगात प्रसिद्ध आहे. पण, कर्जत रेल्वेस्थानकावर मिळणारा हा वडा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. यामुळे जर तुम्ही ट्रेनने महाराष्ट्रातील कर्जत स्थानकावरून जात असाल तर येथील वडा पाव नक्की ट्राय करून पाहा.
८) टाटानगर
झारखंडमधील टाटानगर जंक्शनच्या कॅन्टीनमध्ये मिळणारी फिश करी रेल्वे प्रवाशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. साध्या उकडलेल्या भातासह मिळणाऱ्या या फिश करीचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रवासी या रेल्वेस्थानकावर थांबतात.