Railway Stations India: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. भारतात हजारो रेल्वे स्टेशन आहेत, काही स्टेशन इतके सुंदर बांधण्यात आले आहेत की त्यांच्यासमोर भलेभले मॉल सुद्धा फिके पडतील. तर काही रेल्वे स्टेशनची अवस्था इतकी भीषण असते की तिथे जाण्यासही भीती वाटावी.आज आपण भारतातील अशाच काही कथित Haunted स्टेशनविषयी जाणून घेणार आहोत. अनेक प्रवाशांची अशी मान्यता आहे की याठिकाणी त्यांना सुपर नॅचरल अनुभव आले आहेत. ही सर्व ठिकाणे सर्वात Haunted रेल्वे स्टेशन म्हणून ओळखली जातात. आम्ही या मान्यतांची पुष्टी करत नाही पण शेकडो प्रवाशांनी सांगितलेल्या भुताटकी स्टेशनच्या प्रचलित कहाण्या आपणही जाणून घेऊयात..
बेगुनकोदर रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल मधील पुरुलिया जिल्ह्यातील बेगुनकोदर रेल्वे स्टेशन हे भुताटकीचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. येथे येणाऱ्या प्रवाशांनी सफेद वस्त्र परिधान केलेल्या महिलेला पहिल्याच्या कथा आहेत. हे स्टेशन भुताटकीच्या कथांमुळे तब्बल ४२ वर्ष बंद ठेवण्यात आले होते. मात्र २००९ मध्ये पुन्हा एकदा हे स्टेशन नियमित प्रवासासाठी सुरु करण्यात आले.
नैनी रेल्वे स्टेशन, उत्तरप्रदेश
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील नैनी जेलमध्ये ब्रिटिश काळात अधिकाऱ्यांच्या मारहाणीमुळे अनेक भारतीयांचे मृत्यू झाल्याचे सांगितले जाते, याच जेलपासून काहीच अंतरावर हे नैनी रेल्वे स्टेशन आहे. आजवर इथे ठळकपणे भूत पाहिल्याचे म्हंटले जात नाही पण या स्टेशन परिसरात विचित्र भास होत असल्याचे अनेकजण म्हणतात.
चित्तूर रेल्वे स्टेशन, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात स्थित चित्तूर रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या व्यक्तींकडून सीआरपीएफ कर्मचाऱ्याची एक कथा नेहमी सांगितली जाते. ट्रेनमधून उतरल्यावर हरी सिंह नामक एका CRPF कर्मचाऱ्याला तिकीट निरीक्षकाने प्रचंड मारहाण केली होती, यात त्याचा मृत्यू झाला. अजूनही या परिसरात हरी सिंह यांचा भास होत असल्याचे लोक सांगतात.
बड़ोग रेल्वे स्टेशन, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यात स्थित बड़ोग रेल्वे स्टेशन कालका-शिमला रेल्वेमार्गावर आहे. हे स्टेशन अत्यंत सुंदर असूनही येथील एक भोगद्याशी संबंधित काही भीतीदायक कहाण्या प्रचलित आहेत. बड़ोग भोगद्याचे बांधकाम करण्याची काम ब्रिटिश इंजिनिअर कर्नल बड़ोग यांनी केले होते पण नंतर त्यांनी आत्महत्या केली होती म्हणूनच लोकांना अजूनही त्यांचा भास होत असल्याचे म्हंटले जाते.
हे ही वाचा<< नॉर्थ कोरियाविषयी ‘या’ १० विचित्र गोष्टी वाचून म्हणाल असं जगणं अशक्यच!
मुलुंड स्टेशन, मुंबई
मुंबईमधील मुलुंड रेल्वे स्टेशन तसेच कळवा- मुंब्रा येथील भोगदा हा भुताटकीमुळे कुप्रसिद्ध आहे, अनेकांनी असे सांगितले आहे की रात्रीच्या शेवटच्या ट्रेनच्या वेळी या भागात भीतीदायक अनुभव येऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.)