Indian railway new rule : भारतीय रेल्वेने प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रवास केला असेल. गावी जाण्यासाठी, फिरण्यासाठी किंवा काही कामानिमित्त लांबपल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करण्याचा योग येतो. दररोज लाखो प्रवासी या ट्रेनने प्रवास करतात. पण अनेकदा तिकीट न मिळाल्याने जनरल तिकीट काढून रेल्वेने प्रवास करावा लागतो. यात शिमगा, गणपती आणि व्हेकेशन पिरियडमध्ये रिर्जव्ह तिकीट मिळणं तर दूरचं पण उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. अशावेळी जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेचा हा नवा नियम माहिती असणं अत्यंत गरजेच आहे.
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ट्रेनमधील रिकाम्या सीट्स भरण्यासाठी अनेक नियम बनवले आहेत. अनेक प्रवाशांना या नियमांची माहिती नसते त्यामुळे ते रेल्वेच्या सुविधांचा फायदा घेण्यापासून दूर राहतात. जर तुम्ही नियमित रेल्वे प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा नियम फायदेशीर ठरू शकतो.
हेही वाचा : ‘रेडबुल शो रन’ मध्ये मुंबईकरांना अनुभवायला मिळणार Formula 1 चा थरार, जाणून घ्या सर्वकाही
भारतीय रेल्वेच्या अनेक गाड्या देशाच्या विविध मार्गांवर धावतात. मात्र विशिष्ट स्थानकांनंतर काही स्थानकांपर्यंत अनेक गाड्यांमधील सीट्स रिक्त होतात. त्यामुळे प्रवाशांविना या गाड्या घेऊन जाव्या लागतात. याचा आर्थिक तोटा रेल्वेला सहन करावा लागतो. हा तोटा भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून झोन लेव्हल अनेक नियम बनवले जातात. जेणेकरून संबंधित ट्रेनमधील रिक्त जागा जास्तीत जास्त प्रवाशांनी भरून नेता येईल. याचसंदर्भात रेल्वेने एक नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, जर तुम्ही जर तुम्ही जनरल डब्याचं तिकीट काढून स्लीपर कोचच्या डब्यातून प्रवास करत असाल तर तुमच्याकडून कोणताही दंड घेतला जाणार नाही. ही नवा नियम फायदेशीर असला तरी काही विशिष्ट ट्रेनसाठीचं तो लागू करण्यात आला आहे.
या नियमानुसार, प्रवाशांना या सुविधेचा लाभ वेगवेगळ्या झोनच्या ठराविक गाड्यांमधील ठराविक स्थानकांदरम्यान घेता येणार आहे. या सुविधेअंतर्गत प्रवासी जनरल तिकीटावर स्लीपर कोचमध्ये बसून काही अंतर प्रवास करू शकतात. स्पिलर कोचमध्ये जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्या या प्रवाशाकडून TTE कोणताही दंड आकारणार नाही. हा नियम वेगवेगळ्या झोननुसार लागू होणार आहे.
कुठे लागू आहे हा नियम?
पूर्व मध्य रेल्वेच्या सीपीआरओंच्या माहितीनुसार, बिहारच्या सर्व प्रमुख गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार,
दिल्ली ते दरभंगा बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये प्रवासी जनलर तिकिटावर सोनपूर ते दरभंगादरम्यान स्लीपर कोचमधून प्रवास करू शकतात.
त्याचप्रमाणे दिल्ली ते सहरसा वैशाली एक्स्प्रेसमधून प्रवासी सोनपूर ते बरौनी दरम्यान जनरल तिकीट घेऊन प्रवास करू शकतात. ही सुविधा सप्तक्रांती, ग्वाल्हेर-बरौनी एक्सप्रेस, सरयू-यमुना, हावडा रक्सौल, मगध एक्सप्रेस, धनबाद-पाटणा इत्यादी इतर गाड्यांमध्ये देखील उपलब्ध आहे.
कुठे लागू नसेल हा नियम?
उत्तर रेल्वेच्या माहितीनुसार, उत्तर रेल्वे क्षेत्रातून जाणाऱ्या गाड्यांमध्ये ही सुविधा दिली जाणार नाही. यासोबत दक्षिणेकडील काही गाड्यांमध्येही ही सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्याआधी त्या- त्या क्षेत्रातील गाड्यांसंबंधीत माहिती जाणून घेतली पाहिजे.