बर्याचदा आपण लांबचा प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करतो. कोणत्याही एक्स्प्रेस रेल्वेमध्ये विविध श्रेणीचे कोच असतात, ज्यासाठी प्रवासी आपापल्या गरजेप्रमाणे तिकीट बुकींग करतो. आतापर्यंत आपण कोणत्याही रेल्वेमध्ये एसएल, १ए, २ए, ३ए, २एस आणि सीसी श्रेणींचे कोच पाहिले असतील. पण अलीकडच्या काही रेल्वेंमध्ये एक नवीन प्रकारचा कोचदेखील जोडल्याचं दिसत आहे. ज्यावर एम१, एम२ असं लिहिलेलं असतं.
२०२१ मध्ये, भारतीय रेल्वेने एसी -३ म्हणजेच ३ए श्रेणीचे कोच चांगल्या सुविधांसह रेल्वेला जोडले आहेत. हाच डब्बा एम कोच म्हणून ओळखला जातो. तथापि, ही सुविधा अद्याप काही गाड्यांमध्येच उपलब्ध आहे. त्यामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचे तिकीट कोण बुक करू शकते? याची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.
एसी-३ इकॉनॉमीमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
रेल्वेतील जुन्या एसी -३ टीयरच्या तुलनेत एसी -३ इकॉनॉमी कोच नवीन आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. या कोचची रचना पूर्वीपेक्षा अद्ययावत केली आहे. एसी -३ इकॉनॉमी कोचमधील प्रत्येक आसनावरील प्रवाशासाठी एसी डक स्वतंत्रपणे लावण्यात आला आहे. तसेच प्रत्येक आसनासाठी बॉटल स्टँड, रीडिंग लाईट आणि चार्जिंगची व्यवस्था केली आहे. ज्या रेल्वेत एसी-३ टीयर कोच असतात, त्या रेल्वेत एसी-३ इकॉनॉमी कोच नसतात. एसी-३ च्या नवीन डब्यांना एसी-३ इकॉनॉमी नाव देण्यात आलं आहे. एसी -३ मध्ये ७२ आसनं आहेत, तर एसी -३ इकॉनॉमीमध्ये ११ अधिक आसनं देण्यात आली आहेत. ज्यामुळे यात एकूण ८३ आसनं आहेत.
तिकिटे कोण बुक करू शकतात?
कोणताही प्रवासी एसी -३ इकॉनॉमी कोचचे तिकिट बुक करू शकतो. ज्या रेल्वेत एसी-३ इकॉनॉमी कोच असतात त्या रेल्वेत एसी -३ नसतात. त्यामुळे ज्यांना एसी-३ मधून प्रवास करण्याची इच्छा असेल, त्यांना एसी-३ इकॉनॉमीचं तिकिट बूक करावं लागतं. या कोचमध्ये काही जास्तीच्या सुविधा मिळतात. मात्र, या कोचचं प्रवास भाडंही काही प्रमाणात अधिक असतं. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत अवघ्या काहीच रेल्वेंमध्ये अशाप्रकारचे कोच जोडण्यात आले आहेत.