भारतीय रेल्वेमध्ये कन्फर्म बर्थमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी अनेकदा रिझर्व्हेशन करतात. रेल्वे तिकीट रिझर्व्हेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी केले जाते. प्रवाशांना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन घरबसल्या ऑनलाईन तिकीट बूक करता येते. तर ऑफलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना रेल्वे रिझर्व्हेशन सेंटरवर जावे लागते. पण तिकीट काउंटरवर जाऊन रिझर्व्हेशन करण्यासाठी प्रवाशांना रिझर्व्हेशन फॉर्म भरावा लागतो.
या रेल्वे रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये प्रवाशांना प्रवासाची तारीख, ट्रेन क्रमांक, सोर्स आणि गंतव्यस्थान याबाबत आवश्यक माहिती विचारली जाते. मात्र, याशिवाय काही इतर माहितीही द्यावी लागते. ज्याकडे बहुतांश प्रवासी लक्ष देत नाहीत. रेल्वेच्या आरक्षण फॉर्ममध्ये कोणती माहिती मागितली जाते आणि त्याचा अर्थ काय ते आम्ही तुम्हाला सांगतो.
सामान्यतः, रेल्वे आरक्षण फॉर्म भरताना प्रवासी ट्रेन क्रमांक, ट्रेनचे नाव, प्रवासाची तारीख, ट्रॅव्हल क्लास, सीट्सची संख्या, स्टेशनचे नाव इत्यादी माहिती भरतात. पण फॉर्मच्या वर दिलेल्या महत्त्वाच्या सूचना वाचत नाहीत. ज्यामध्ये तुमच्याकडून काही महत्त्वाची माहिती मागवली आहे, जी तुमच्यासाठी तसेच इतर प्रवाशांसाठी आणि रेल्वेसाठी उपयुक्त ठरू शकते.
रेल्वेच्या रिझर्व्हेशन फॉर्मच्या वरती प्रवाशांना विचारले जाते की, तुम्ही डॉक्टर आहात का, कारण आपत्कालीन परिस्थितीत तुमच्याकडून मदत घेतली जाऊ शकते. जर एखादी महिला गरोदर असेल आणि तिला या कोट्यात सीट बुक करायची असेल तर हा पर्याय निवडू शकते. त्याच वेळी, जर तुम्हाला अतिरिक्त शुल्क न घेता तिकीट अपग्रेड करायचे असेल तर बॉक्समध्ये होय किंवा नाही लिहा. जर तुम्हाला तुमचे तिकीट विकास योजनेअंतर्गत पर्यायी ट्रेनमध्ये शिफ्ट करायचे असेल, तर बॉक्समध्ये होय किंवा नाही असे लिहा. मात्र हा पर्याय केवळ वेटिंग लिस्टमधील प्रवाशांसाठी आहे.
फॉर्म भरताना कोणती खबरदारी घ्यावी?
रेल्वे आरक्षण करताना प्रवाशांनी काळजीपूर्वक फॉर्म भरावा. विशेषत: प्रवाशांशी संबंधित माहिती, जसे की नाव आणि वय, कारण चुकीचे नाव लिहिल्यास, प्रवासाच्या वेळी तपासणीदरम्यान नाव आणि वय जुळत नसल्यास प्रवाशावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. म्हणूनच नाव आणि वय लिहिताना नेहमी काळजी घ्या.
तुम्हाला ट्रेनमध्ये तुमच्या आवडीचा बर्थ हवा असेल तर तुमची पसंती फॉर्ममध्ये नमूद करा. दुसरीकडे जर तुम्ही राजधानी, शताब्दी आणि दुरांतोसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, ज्यामध्ये जेवण दिले जाते, यात तुमच्या पसंतीचे म्हणजे शाकाहारी किंवा मांसाहारी पर्यायावर टिक करा. याशिवाय जर तुम्ही पाच वर्षांखालील मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्ही त्यांची माहिती फॉर्ममध्ये द्यावी. मात्र, त्यांना तिकीट दिले जात नाही. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या परतीच्या प्रवासाचा तपशील देऊन परतीचे तिकीटदेखील बुक करू शकता. फॉर्मच्या शेवटी तुमचे नाव, पत्ता आणि मोबाइल नंबर नेहमी बरोबर लिहा, जे आपत्कालीन परिस्थितीत खूप महत्त्वाचे आहे.