Indian Railways: देशात रोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेकदा रेल्वे स्टेशनवर कोणालातरी सोडायला जातो. त्यावेळी आपण प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करतो. कारण प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटशिवाय रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला तर अशावेळी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. प्लॅटफॉर्मवर ट्रेनने प्रवास करणाऱ्यांपेक्षा सोडणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने अशा लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणे बंधनकारक केले आहे.
पण तुम्ही खरेदी केलेले प्लॅटफॉर्म तिकीट किती काळ वैध राहते तुम्हाला माहिती आहे का? याशिवाय प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिटासह कोणत्या अनेक विशेष सुविधा मिळतात. याविषयी सविस्तर जाणून घेऊ…
१० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस प्लॅटफॉर्मवर थांबू शकत नाही, रेल्वेच्या नियमानुसार, प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यापासून तुम्ही फक्त २ तास स्टेशनवर थांबू शकता. म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता फक्त २ तास आहे. म्हणून पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला स्टेशनवर घ्यायला किंवा सोडायला जाल तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट अवश्य खरेदी करा, त्या वेळेकडे विशेष लक्ष द्या. असे होऊ नये की, तुम्ही दोन तासांपेक्षा अधिक काळ प्लॅटफॉर्मवर थांबला आणि तुम्हाला दंड भरावा लागला.
प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यास दंड
जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढायला विसरलात तर रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी तुमच्याकडून किमान २५० रुपयांचा दंड आकारु शकतात. एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक दंड म्हणून त्या प्लॅटफॉर्मवरुन निघालेल्या मागील ट्रेनच्या किंवा त्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या ट्रेनचे दुप्पट भाडे देखील आकारले जाऊ शकते.
प्लॅटफॉर्म तिकीटे मर्यादित असतात का?
प्लॅटफॉर्मवरील उपलब्ध जागेनुसार, प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जातात. याचा अर्थ असा की, प्लॅटफॉर्मच्या क्षमतेपेक्षा जास्त प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जात नाहीत. जर क्षमतेनुसार, प्लॅटफॉर्म तिकीट आधीच दिली गेली असतील तर रेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्म तिकीट मागणाऱ्या व्यक्तीस तिकीट देण्यास नकार देऊ शकतो.