Indian Railway : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वे अनेक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करते. अनेक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी रेल्वेची निवड करतात.
परंतु, तरीही ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा विविध अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागतो. यातीलच एक समस्या म्हणजे ट्रेनमधील आरक्षित केलेली सीट मिळवणे. ट्रेनमधून प्रवास करताना तुम्हालाही अनुभव आला असेल की, तुमच्या आरक्षित सीट्सवर दुसराच प्रवासी येऊन बसतो. यावेळी त्याला तिकीट दाखवून सीटवरून उठण्यास सांगितल्यास वाद घातला जातो. काहीवेळा हाणामारीपर्यंत गोष्टी घडतात. अशावेळी तुमच्याकडे आरक्षित सीट असूनही तुम्हाला बसण्यास जागा मिळत नाही. अशावेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशावेळी प्रवाशांनी तक्रार कुठे करायची, कोणाकडे मदत मागायची? याविषयी जाणून घेऊ..
भारतीय रेल्वेने हल्ली ट्विटर अकाउंटद्वारेदेखील प्रवाशांची मदत करण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल इंडियाच्या पुढाकारामुळे प्रवाशांना घरबसल्या तिकीट बुकिंगपासून जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सुविधा वापरता येतात. पण, अनेकदा प्रवास करताना तुमच्या आरक्षित सीटवर दुसरा प्रवासी बसतो आणि तो तुम्हालाच अॅडजेस्ट करण्याचा सल्ला देतो. अशावेळी तुम्ही रेल्वेकडे तक्रार करून तुमची सीट रिकामी करून घेऊ शकता.
रेल मदत अॅपवर नोंदवा तक्रार
अशी घटना घडल्यास तुम्हाला सर्वप्रथम टीटीईकडे तक्रार करावी लागेल. जर तुम्हाला ट्रेनमध्ये टीटीई दिसला नाही तर तुम्ही रेल्वे मदत अॅपवर तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम RailMadad अॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि Send OTP वर क्लिक करावे लागेल.
तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून तुमचा ट्रेन तिकिटावरील PNR नंबर टाकावा लागेल. आता टाईपवर क्लिक करा आणि तुमची तक्रार निवडा. यानंतर घटनेची तारीख निवडा, आता तुमची सविस्तर तक्रार लिहा आणि सबमिट बटणावर क्लिक करा, अशाप्रकारे तुम्ही तुमची तक्रार रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवू शकता.
तुम्ही याबाबत टीटीईकडे किंवा ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता, पण या दोन्ही सुविधा वापरता न आल्यास तुम्ही १३९ या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावरही तक्रार नोंदवू शकता आणि तुमच्या समस्यांचे निराकरण करू शकता.
यात प्रवाशांनी ट्विटरवरही तक्रार केल्यास रेल्वे प्रशासनाकडून त्याची तात्काळ दखल घेतली जाते, त्यामुळे अनेक प्रवासी ट्विटर तक्रार करून प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवताना दिसतात.