Indian Railways Toilets History : भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वांत मोठी रेल्वे सेवा मानली जाते. भारतीय रेल्वेच्या हजारो गाड्यांमधून रोज सुमारे तीन कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलिया देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. आरामदायी आणि स्वस्त प्रवासासाठी लोक रेल्वे प्रवासाला पसंती देताना दिसतात. त्यात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील प्रत्येक डब्यात शौचालयाची सुविधा दिसून येते. मात्र, प्रत्येक रेल्वेच्या डब्यात शौचालयाची सुविधा कधीपासून सुरू झाली? नेमकं काय घडलं? ते आपण जाणून घेऊ.
१९०९ मधील ही घटना आहे. त्या काळात फक्त प्रथम श्रेणीच्या रेल्वे डब्यांमध्ये शौचालयाची सुविधा होती. कडक उन्हाळा सुरू होता. ओखिल चंद्र सेन नावाचा एक बंगाली गृहस्थ रेल्वेतून प्रवास करीत होते. अनेक तास एकाच जागी बसून आणि उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला, ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. त्यांना पोटात दुखू लागून, अपचनाचा त्रास सुरू झाला. अखेर ट्रेन अहमदपूर रेल्वेस्थानकावर थांबली आणि ओखिल चंद्र सेन यांनी लगेच स्थानकावर उतरुन पाण्याने भरलेला लोटा घेत आडोसा गाठला.
काही वेळातच रेल्वे गार्डने शिट्टी वाजवून ट्रेन सुटणार असल्याची सूचना दिली आणि ट्रेन सुरू झाली. त्यामुळे ओखिल चंद्र सेन लगेच एका हातात लोटा घेऊन, दुसऱ्या हाताने धोतर सांभाळत उठले आणि धावत सुटले. त्यावेळी ट्रेनच्या डब्यात चढणार इतक्यात धोतरात पाय अडकून ते खाली कोसळले. त्यात त्यांचे धोतर सुटले, ज्यामुळे सर्व प्रवाशांसमोर त्यांच हसं झालं. तसेच ट्रेनदेखील सुटली. त्यामुळे त्यांन अहमदपूर स्टेशनवरच थांबावे लागले.
एका प्रवाशाच्या पत्राने रेल्वेत सुरू झाली शौचालयाची सुविधा
त्या घटनेनंतर त्यांनी तत्काळ साहिबगंज रेल्वे मंडळाला एक पत्र लिहिले आणि घडलेल्या घटनेविषयीची सविस्तर माहिती दिली. या पत्रात त्यांनी रेल्वेला एखादा प्रवासी जर स्थानकावर शौचालयात गेला असेल, तर रेल्वेचा गार्ड ट्रेन पाच मिनिटेही थांबवू शकत नाही का, असा प्रश्न विचारला. तसेच त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेप्रकरणी संबंधित रेल्वे गार्डला दंड ठोठवावा, अशी मागणी ओखिल चंद्र सेन यांनी पत्राद्वारे केली. इतकेच नाही, तर रेल्वेने त्या पत्राची दखल घेत मागणी पूर्ण न केल्यास, ती सर्व घटना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा इशाराही दिला.
अखेर रेल्वेने पत्राची गांभीर्याने घेतली दखल
अखेर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पत्राची गांभीर्याने दखल घेत, पुढील दोन वर्षांत रेल्वेगाड्यांच्या प्रत्येक डब्यात शौचकूपांची सुविधा उपलब्ध करून दिली.
अखिल चंद्र सेन यांच्याबाबतच्या त्या घटनेनंतर अखेर १९०९ पर्यंत भारतीय गाड्यांमध्ये शौचकूपांची सुविधा सुरू झाली आणि त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी झाला. ओखिल चंद्र सेन यांनी त्या काळी लिहिलेले पत्र आजही दिल्लीतील रेल्वे म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे.
कारण- अखिल चंद्र सेन यांच्या त्या पत्रामुळे आज लाखो रेल्वे प्रवाशांना प्रवास करताना शौचकूपाच्या सुविधेचा वापर करता येत आहे. १९४० च्या दशकापर्यंत रेल्वेने लांब पल्ल्याच्या सर्व वर्गांच्या डब्यांमध्ये शौचालये बसवण्यास सुरुवात केली. या परिवर्तनामुळे देशभरातील प्रवाशांसाठी स्वच्छता आणि प्रवासाच्या आरामात लक्षणीय सुधारणा झाली.
सुरुवातीला ट्रेनचे शौचकूप थेट रुळांवर उघडले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने स्वच्छता व शाश्वतता राखण्यासाठी फ्लशिंग सिस्टीम आणि अखेरीस २०१० च्या दशकात बायो-टॉयलेट सुरू करून स्वच्छता श्रेणी सुधारित करण्याचे काम केले.