Indian Railways Yellow Striped Tiles : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही आधुनिक शहरांतील लाइफलाइन मानली जाते. या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वे, मेट्रो, बस या गोष्टींचा समावेश आहे. सामान्य नागरिकांपासून ते अपंगापर्यंत सर्वांना यातून सुलभ आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न केले जातात. तुम्ही भारतातील विविध रेल्वेस्थानकांवर गेलात, तर तुम्हाला आढळेल की, प्लॅटफॉर्म जिथे आपण उभे राहतो, तिथे लाल आणि पिवळ्या रंगाच्या टाइल्स असतात. या टाइल्स वेगवेगळ्या डिझाइनच्या असतात.

या टाइल्सवरून चालताना अनेकदा आरामदायी वाटते. कारण- त्यावरील उभ्या रेषा आणि गोल आकारांमुळे चालताना बुटांना चांगली ग्रिप मिळते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतातील रेल्वेस्थानकांवर लाल आणि पिवळ्या रंगाच्या टाइल्स नेमक्या कोणत्या कारणासाठी लावल्या जातात? भारतीय रेल्वे कोणतेही काम कोणत्याही उद्देशाशिवाय करीत नाही. म्हणूनच या टाइल्स बसवण्यामागेही एक मोठे कारण आहे, तेच आपण सविस्तर जाणून घेऊ…

लाल, पिवळ्या रंगाच्या टाइल्स का बसवल्या जातात?

रेल्वेस्थानकावर बसवलेल्या पिवळ्या, लाल टाइल्सना टॅक्टाइल टाइल्स, असेही म्हणतात. पण, त्या बसवण्यामागचा मुख्य उद्देश अंध प्रवाशांना मार्ग दाखवणे हा आहे. पूर्वीच्या काळी रेल्वेस्थानकांवर रेलिंग नव्हत्या. पण रेल्वेस्थानके ही सुरुवातीपासूनच गर्दीचे केंद्र राहिली आहेत. त्या काळी वाहतुकीची मर्यादित साधने होती. त्यामुळे बहुतेक लोक ट्रेनने प्रवास करणे सोईचे मानायचे; पण इतक्या गर्दीत अनेक अंध लोकांना रेल्वे ट्रॅकचा अंदाज येत नव्हता. अशा वेळी ते काही वेळा अपघातांचे बळी पडण्याची शक्यता अधिक होती. याचीच दखल रेल्वेने घेतली आणि रेल्वेस्थानकावर पिवळ्या टाइल्स टाकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अंध व्यक्ती रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅकचा सहज अंदाज घेऊ शकतात.

जर स्टेशनवरील टाइल्स तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यात, तर तुम्हाला लाल आणि पिवळ्या टाइल्सच्या वेगवेगळ्या डिझाइन दिसतील. पिवळ्या किंवा गोल आकाराची डिझाइन असलेल्या टाइल्स असतील, तर त्या असे सूचित करतात की, तुम्हाला येथे थांबायचे आहे. अंध व्यक्तीला या टाइल्समुळे रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्ममधील अंतर समजू शकते. या टाइल्स प्लॅटफॉर्मच्या अगदी काठाजवळ बसवलेल्या असतात. तर सरळ रेषांच्या डिझाइन्स असलेल्या टाइल्स म्हणजे तुम्ही पुढे चालत जाऊ शकता. या टाइल्सच्या मदतीने अंध लोकांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालणे खूप सोपे जाते.

या टाइल्स नेमक्या आल्या कुठून?

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील या टाइल्सना ब्रेल ब्लॉक्स किंवा तेन्जी ब्लॉक्स, असेही म्हणतात. १९६५ मध्ये जपानमधील सेइची मियाके यांनी या टाइल्सचा शोध लावला. मूलत: अंध पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या आपला मार्ग ओळखता यावा आणि रेल्वेस्थानकांवरील गर्दी, अडथळे, धोके ओळखण्यास मदत व्हावी अशा प्रकारे त्या डिझाइन केल्या गेल्या आहेत. या टाइल्स प्रथम १९६७ मध्ये ओकामाया शहरात दिसून आल्या. ही संकल्पना काही काळात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, ज्यानंतर भारतासह अनेक देशांत सार्वजनिक ठिकाणी विशेषत: मेट्रो आणि रेल्वेस्थानकांवर या टाइल्स लावल्या जाऊ लागल्या.

या टाइल्समुळे सर्वसामान्य प्रवाशांनाही सतर्क करता येते. रेल्वे रुळांपासून थोड्या अंतरावरच पिवळ्या रंगाच्या टाइल्स बसवल्या जातात. ज्यातून प्रवाशांना असे सूचित केले जाते की, प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्यापूर्वी टाइल्सच्या मागे उभं राहून वाट पाहावी. कारण- ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा तिचा वेग अधिक असतो. त्यामुळे कोणताही अपघात टाळण्यासाठी प्रवाशांनी ट्रेन थांबेपर्यंत या पिवळ्या टाइल्सच्या मागे थांबावे.

त्याशिवाय रेल्वे स्वतःच्या सोईसाठी या पिवळ्या टाइल्सखाली केबल्स, नेटवर्किंग वायर्स इत्यादी टाकते. कोणताही तांत्रिक बिघाड झाला की, या टाइल्स सहजपणे काढता येतात आणि दुरुस्त करता येतात.

Story img Loader