Why Indian Railways Run Faster At Nights : भारतीय रेल्वे ही भारतीयांची जीवनवाहिनी आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कधी उशीर होतो, कधी प्रचंड गर्दी असते, कधी अस्वच्छता असते वगैरे वगैरे कितीही तक्रारी असल्या तरी ट्रेनने प्रवास करणं हा सगळ्यात सोपा, सोईस्कर आणि तुलनेनं सुरक्षित मार्ग आहे, असं मानलं जातं. ट्रेनची तिकिटे एखाद्या कॉन्सर्टपेक्षाही वेगाने बुक होतात हे काही वेगळं सांगायला नको. त्यातही रात्रीची ट्रेन असेल, तर तिकीट मिळवणं हे युद्ध लढण्यासारखं कठीण असू शकतं. तुम्ही कधी विचार केलाय की, रेल्वेनं प्रवास करणं म्हणजे निसर्ग डोळ्यांत साठवत जाणं असा अर्थ असूनही रात्रीच्याच ट्रेनला इतकी मागणी का असते? अर्थात, यामागे अनेक कारणं आहेत. पण, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रात्रीचा प्रवास हा दिवसाच्या तुलनेने वेगात होतो, असं म्हणतात. दिवसाच्या तुलनेत रात्री गाड्यांचा वेग हा जास्त असतो. असं होण्यामागे नेमकं कारण काय, ते आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
रुळांभोवती गर्दी कमी, ट्रेनचा वेग सुसाट….
ट्रेनचा वेग अनेक प्रमुख घटकांवर अवलंबून असतो. रात्रीच्या वेळी गाड्या जास्त वेगवान असण्याचं एक सर्वांत मोठं कारण म्हणजे ट्रॅकभोवतीची हालचाल कमी असते. व्यावहारिक विचार करणाऱ्या ट्रेन प्रवाशांना आधीपासूनच ही गोष्ट माहीत आहे की, दिवसा रेल्वे रुळांजवळ लोक आणि प्राण्यांची जास्त हालचाल असते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी आपोआप विलंब होतो किंवा गाड्यांचा वेग कमी होतो. पण, रात्रीच्या वेळी रुळांभोवती कमी लोक आणि प्राणी असतात, ज्यामुळे मोटरमनना ट्रेनचा वेग कमी न करता, वेगात अधिक अंतर पार करणे सोपे होते.
देखभालीला ब्रेक, ट्रेन वेगवान!
आणखी एक प्रमुख कारण म्हणजे रात्री रुळांच्या दुरुस्तीच्या किंवा देखभालीच्या कामांनाही ब्रेक मिळालेला असतो. ही कामं दिवसभरात होत असल्यानं बऱ्याचदा ट्रेनला थांबून राहावं लागतं. रात्रीच्या वेळी काही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा विलंब टाळता येतो आणि ट्रेन अनावश्यक थांब्यांशिवाय त्यांचा वेग कायम ठेवू शकते.
रात्रीच्या वेळी ट्रेनच्या चालकांना दिसतं कसं?
आता इथे एक प्रश्न आपल्यालाही पडला असेल आणि तो म्हणजे रात्रीच्या वेळी चालकांना नीट दिसत असेल का? तर उलट, दिवसभरात सूर्यप्रकाशामुळे सिग्नल दिसायला अडचणी येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अनेकदा ट्रेनचालकांना गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. मात्र, दुसरीकडे रात्रीच्या वेळी मोटरमनला जास्त अंतरावरूनही सिग्नल स्पष्टपणे दिसतात, ज्यामुळे ट्रेन वेगाने पुढे जाऊ शकते.
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे रात्री हवेत येणारा गारवा. तांत्रिकदृष्ट्या, रात्रीच्या वेळी लक्षणीयरीत्या थंड तापमानामुळे ट्रेन अधिक सुरळीतपणे चालण्यास मदत होते. कारण- कमी तापमान इंजिनला जास्त गरम होण्यापासून रोखते. एक शेवटचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकांवर कमी प्रवासी असतात म्हणजेच लोक चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी वाट पाहण्यात कमी वेळ लागतो. कमी गर्दीमुळे जलद थांबे मिळतात आणि विलंब कमी होतो, ज्यामुळे प्रवास वेगाने होण्यास मदत होते.