Mohenjo-daro history अलीकडेच सिंधू संस्कृतीच्या शोधाला १०० वर्ष पूर्ण झाली. हडप्पा या स्थळावर आधी उत्खनन झाले तरी या संस्कृतीची ओळख मोहेंजोदारो या स्थळावर करण्यात आली होती. त्यामुळेच सिंधू संस्कृतीच्या शोधाच्या इतिहासात या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या हे स्थळ पाकिस्तानमध्ये आहे आणि या स्थळाला अनेकदा ‘मृतांचे शहर’ असेही संबोधले जाते. मूलतः सिंधू संस्कृती ही जगातील चार प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. या संस्कृतीने जागतिक इतिहासाची दिशा बदलली. भारतीय इतिहासातील समृद्धीचा वारसा या संस्कृतीच्या रूपाने पुढे आला. त्याच पार्श्वभूमीवर मोहेंजोदारो या स्थळाला ‘मृतांची टेकडी’ असे का म्हटले जाते हे जाणून घेणं नक्कीच माहितीपूर्ण ठरावे.
मोहेंजोदारो या नावाचा नेमका अर्थ काय?
मोहेंजोदारो या नावाचा सिंधी भाषेतील अर्थ मृतांचे टेकाड असा होतो. मोहेंजोदारो हे नाव दोन शब्दांच्या संयोजनातून तयार झाले आहे. ‘मोहोन’ ज्याचा अर्थ ‘ढीग’ किंवा ‘टेकडी’ आणि जोदारो ज्याचा अर्थ ‘मृतांचा’ असा होतो. या शहराच्या किंवा या स्थळावरील सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर या जागेला हे नाव पडलं. या स्थळावर उत्खनन सुरु असताना अनेक दफने- थडगी सापडली. त्यामुळेच या स्थळाचा संबंध मृतांशी जोडला गेला असावा.
अधिक वाचा: R. D. Banerjee-Mohenjo-Daro Man: मोहेंजोदारो मॅनचं पुढं झालं काय? १०० वर्षांनंतरही गूढ कायम
पुरातत्वीय पुरावे काय सुचवतात?
उत्खननाच्या वेळी पुरातत्त्वशास्त्रज्ञांना या स्थळावर अनेक मानवी सांगाडे सापडले. त्यातही बरेच सांगाडे अचानक झालेला मृत्यू दर्शवतात. काही सिद्धांतानुसार, येथील लोक आक्रमण, नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या रोगामुळे अचानक मृत्युमुखी पडले असावेत, त्यामुळे या शहराचा मृत्यूशी असलेला संबंध अधिक मजबूत झाला असावा असे मानले जाते.
ऱ्हासाची कारणे
मोहेंजोदारो या शहराचा ऱ्हास सुमारे इ.स.पू. १९०० च्या सुमारास झाला. या शहराच्या ऱ्हासाची कारणे अद्याप वादग्रस्त आहेत. नदीच्या प्रवाहातील बदल, हवामान बदल, किंवा आर्थिक संकटामुळे या शहरांचा ऱ्हास झाला असावा असे मानले जाते.
गूढता आणि तर्कवितर्क
मोहेंजोदारो या शहराच्या ऱ्हासाबद्दल निश्चित माहितीच्या अभावामुळे अनेक तर्कवितर्क आणि गूढता निर्माण झाली आहे. या शहराच्या पतनाविषयी असलेल्या गूढतेने आणि तेथे सापडलेल्या सांगाड्यांनी या शहराची ओळख ‘मृतांची टेकडी’ म्हणून निर्माण केली. प्रामुख्याने या शहराच्या नावाच्या अनुवादामुळे आणि उत्खननादरम्यान सापडलेल्या मानवी अवशेषांमुळे आणि सिंधू संस्कृतीच्या झालेल्या ऱ्हासामुळे कधीकाळी भरभराटीला आलेल्या या शहराला ‘मृतांची टेकडी’ असे म्हटले जाते