भारतात चित्रपटांचा एक चाहता वर्ग मोठा आहे. यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित जवळपास हजारो चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर रिलीज होतात. यातील काही चित्रपट हे तुफान चालतात. ज्यांना प्रेक्षकही डोक्यावर घेतो. तर काही चित्रपट चांगलेच आपटतात. यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणारे नवीन चित्रपट पाहण्यासाठी दर आठवड्याला शुक्रवारची वाट पाहणारे अनेक जण आहेत.
आपल्या देशात अनेक चित्रपट हे तयार होतात यामुळे दर आठवड्याला बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे चित्रपट पाहायला मिळतात. यामागचे कारण म्हणजे भारतात अनेक भाषा आहेत आणि त्या-त्या भाषांमध्ये वेगवेगळे विषय हे चित्रपटाच्या माध्यमातून हाताळले जातात. हेच भारतीय चित्रपटसृष्टीत वैविध्य आहे.
अनेक देशांमध्ये जिथे फक्त एकाच भाषेत चित्रपट बनवले जातात. मात्र भारत या बाबतीत खूप पुढे आहे. आपल्याकडे भाषांची विविधता आहे त्यामुळे चित्रपटही अनेक भाषांमध्ये बनवले जातात. पण भारतात चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत, एक समानता दिसून येते, ती म्हणजे बहुतेक चित्रपट हे शुक्रवारीच प्रदर्शित होतात. पण चित्रपट प्रदर्शनासाठी शुक्रवारचं का निवडला जातो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? पडला असेल तर त्याचे सविस्तर कारणही जाणून घेऊया…
…म्हणून बहुतेक चित्रपट शुक्रवारी होतात प्रदर्शित
भारतीय चित्रपटसृष्टीत चित्रपट फक्त शुक्रवारी प्रदर्शित होतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शुक्रवार हा आठवड्याचा शेवटचा वर्किंग डे मानला जातो. तर शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असतात. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतेक लोक त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह शुक्रवारी रात्री किंवा शनिवार, रविवारी चित्रपट पाहण्यासाठी जातात. यामुळे एखाद्या चित्रपटाचे कलेक्शन चांगले होते, तसेच यातून चित्रपटाचे यश-अपयशही ठरले जाते.
यामागचे आणखीन एक कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे भारतात बहुतांश लोकांकडे रंगीत टीव्ही नव्हता. त्यामुळे लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी अर्ध्या दिवसानंतर सुट्टी दिली जात होती. जेणेकरून तेही कुटुंबासोबत चित्रपट पाहू शकतील आणि हे चित्रपटाच्या कलेक्शननुसारही चांगला मानले जात होते.
चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची प्रथा कुठून आली?
शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा भारताची नाही. १९४० च्या सुमारास हॉलिवूडमध्ये याची खरी सुरुवात झाली. १९६० पूर्वी भारतात चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नव्हता. यादरम्यान १९६० मध्ये ‘मुघल-ए-आझम’ हा ऐतिहासिक चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. ५ ऑगस्ट १९६० या दिवशी शुक्रवार होता. या चित्रपटाने बरेच यश कमावले. केवळ भारतातच नाही तर जगभरात याची चर्चा झाली.
त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शुक्रवारचा दिवस निवडण्यास सुरुवात केली. मात्र, सर्वच चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित होतात, असे नाही. हा ट्रेंड मोडून अनेक चित्रपट निर्मात्यांनी वेगवेगळ्या दिवशीही चित्रपट प्रदर्शित केले आणि त्यांना यशही मिळाले आहे. पण विशेषत: बॉलिवूडमध्ये शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याचा ट्रेंड अद्यापही फॉलो केला जातो.