लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रत्येकाला परवडणारी वाहतूक सेवा म्हणजे भारतीय रेल्वे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण प्रवासासाठी भारतीय रेल्वेचा पर्याय निवडतो. यामुळे भारतीय रेल्वेला आज लाइफलाइन म्हटले जाते. लांब पल्ल्याच्या आरामदायी आणि स्वस्त तिकीट सुविधेमुळे प्रत्येकाला ट्रेनचा प्रवास परवडणारा वाटतो. पण कन्फर्म तिकीट मिळाले तर प्रवास करणे आणखी सोयीचे जाते. कारण अनेकदा लांब पल्ल्याचा प्रवास २ ते ३ दिवसांचा असतो. अशा वेळी कन्फर्म तिकीट नसेल तर प्रवासात खूप अडचणी येतात. पण सणासुदीच्या किंवा सुट्ट्यांच्या दिवसांत प्रयत्नही करून अनेकदा ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळत नाही. रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेचे काही नियम सांगणार आहोत. हे नियम काय आहेत जाणून घेऊ…
भारताची लोकसंख्या ही जगातील इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. प्रत्येक राज्याला जोडण्यासाठी आपल्याकडे अनेक रेल्वे मार्ग आहेत. पण या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या कमी आणि प्रवासी जास्त, अशी एक समस्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळू शकेल हे शक्य नाही. यात अनेकदा रेल्वेच्या नियमांची माहिती नसल्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी रेल्वेचे नियम काय आहेत जाणून घेऊ.
रेल्वेचा नियम काय म्हणतो?
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, कोणताही प्रवासी ट्रेन सुटण्याच्या चार महिने आधी म्हणजेच १२० दिवस आधी आपली सीट बुक करू शकतो. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असते.
तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ट्रेनचे तत्काळ तिकीटदेखील बुक करू शकता. तत्काळ तिकीट ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी बुक केले जाते. एसी ट्रेनची तत्काळ तिकिटे बुक करण्याची सेवा रोज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते तर स्लीपर कोचची तत्काळ तिकीट बुकिंग सेवा सकाळी ११ वाजल्यापासून म्हणजे एक तासानंतर सुरू होते.
रोज तुम्ही ट्रेनने प्रवास करताय? मग MEMU, EMU आणि DEMU ट्रेनमधील फरक माहीत आहे का? जाणून घ्या…
अनारक्षित तिकिटांसाठी वेगळे नियम
अनारक्षित तिकिटे खरेदी करण्यासाठी रेल्वेने दोन वेगळे नियम केले आहेत, म्हणजे जर तुम्हाला १९९ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरापर्यंत ट्रेनच्या जनरल कोचमधून प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या दिवशी तिकीट खरेदी करावे लागेल. या प्रवासासाठी तुमचे तिकीट फक्त तीन तासांसाठी वैध असते.
पण जर तुम्हाला २०० किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतराचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही तीन दिवस आधी जनरल तिकीट बुक करू शकता.
फोनवर करू शकता तिकीट बुक
आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे तुम्हाला घरबसल्या तिकीट बुकिंगची सुविधा देते . तुम्ही रेल्वे आयआरसीटीसीच्या अधिकृत अॅप किंवा त्याच्या वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.
यामुळे तुम्हाला आता पूर्वीप्रमाणे लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. रेल्वे आयआरसीटीसी अॅप दिवसेंदिवस अपडेट करत आहे. जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये.