देवाची पूजा जेव्हा केली जाते तेव्हा उदबत्ती हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. उदबत्ती पेटवून देवापुढे लावली जाते. उदबत्तीचा मंद दरवळ हा देवळातलं, घरातलं वातावरण मंगलमय करतो. चीनमध्ये देवतांसमोर पेटवण्यात येणारी जॉसस्टिक उदबत्तीसारखीच असते. वैविध्यपूर्ण सुगंधांमध्ये ही उदबत्ती उपलब्ध असते. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे उदबत्ती किंवा धूप घेऊन तो-तो व्यक्ती उदबत्ती घरामध्ये लावतो. काही दिवसांपूर्वीच अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १०८ फुटांची उदबत्ती पाठवण्यात आली होती. त्याचीही चर्चा झाली होती. उदबत्ती म्हणायचं की अगरबत्ती? असाही प्रश्न अनेकांना पडतो.
अगरबत्ती हे नाव कसं तयार झालं?
अगरबत्ती का म्हटलं जातं? याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अगरु नावाचा वृक्ष. नागालँड, मिझोरम, भूतान आणि आसाम या राज्यांमध्ये हा वृक्ष आढळतो. या झाडाचं खोड मऊ असतं आणि त्याच्या आतल्या भागात सुगंधी तेल असतं. खोडाचा हा भाग पाण्यातही बुडतो. अगरु वृक्षाचे तेल हा मुख्य घटक असणारा भाग म्हणजे अगरबत्ती. अगरु हा संस्कृत शब्द आहे. हिंदी आणि बंगालीत तो झाला अगर. त्यापासून तयार करण्यात आलेली काडी झाली अगरबत्ती. अगरुचा काढा आयुर्वेदातही वापरला जातो. अगरु हा वृक्ष अॅडम आणि ईव्हने स्वर्गातून जमिनीवर आणला अशीही अख्यायिका आहे. कहाणी शब्दांची मराठी भाषेच्या जडणघडणीची या सदानंद कदम लिखित पुस्तकात हा उल्लेख आहे.
उदबत्ती तयार कशी होते?
उदबत्ती हा अगरबत्तीचा समानार्थी शब्द आहे. अगरु, चंदन, कापूर, काचरी, वाळा, दालचिनी, धूप, हळमद्दी, उद, वुड, गोंद अशा घटकांपासून उदबत्ती तयार केली जाते. ती विविध सुगंधांमध्ये उपलब्ध असते. मंद आणि तीव्र सुगंधांच्या उदबत्त्या बाजारात सहज मिळतात. हाताने उदबत्ती किंवा अगरबत्ती जात असे. आत्ताही त्या हाताने तयार होतात पण उदबत्ती किंवा अगरबत्ती तयार करण्याची मशीन्सही आली आहेत. भारत हा अगरबत्तीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तसंच सर्वाधिक निर्यात करणाराही देश आहे. हाँगकाँग, सिंगापूर, पाकिस्तान, थायलँड, चीन, जपान, अमेरिका या देशांमध्येही उदबत्तीची निर्मिती केली जाते. भारतात तयार होणाऱ्या एकूण उदबत्ती उत्पादनापैकी ७० टक्के उत्पादन हे कर्नाटकातून केलं जातं. उदबत्ती प्रमाणेच धूपही तयार केला जातो. त्यात काडीचा वापर होत नाही. ओला धूप आणि कोरडा धूप अशा दोन प्रकारांमध्ये विविध सुगंधांचा धूप बाजारात उपलब्ध असतो.
हे पण वाचा- भीम आणि शिकरण यांचं नातं आहे तरी काय? महाभारत काळात या पदार्थाचं नाव काय होतं?
ज्ञानेश्वरीत अगरु शब्दाचा उल्लेख
ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी अगरु या शब्दाचा उल्लेख केला आहे. कर्पूर चंदन अगरु, ऐसे सुगंधाचा महामेरु असा उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे. त्यामुळे उदबत्ती लावण्याची प्रथा ही ज्ञानेश्वर काळापासून होती हे लक्षात येतं.