पुणे शहर म्हटले कि फिरण्यासाठी शनिवार वाडा, सारसबाग, पर्वती, दगडूशेठ गणपती, तुळशीबाग अशी नावं हमखास प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतात. मात्र जंगली महाराजसारख्या वाहत्या रस्त्यावरच एक अतिशय प्राचीन आणि सुंदर अशी लेणी असून त्या लेणीमध्ये प्रचंड शांतात व गारवा अनुभवायला मिळतो. तुम्हाला कधी पुण्यामध्ये फिरण्यासाठी एखाद्या नवीन जागेला भेट द्यायची असेल तर या ‘पाताळेश्वर लेणी’ला आवर्जून भेट देऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर तुम्ही जर वेरूळच्या लेणीला भेट दिली असल्यास, पाताळेश्वर लेण्यांमध्ये आणि वेरूळच्या लेणीमध्ये तुम्हाला साम्य जाणवू शकते. मात्र असे का, या लेणी कोणत्या काळातील आहेत, या ऐतिहासिक वास्तूचे वैशिष्ट्य काय या सर्वांबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. चला सुरु करू पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असणाऱ्या पाताळेश्वर लेणीची सफर.

पाताळेश्वर लेणीचा इतिहास

महाराष्ट्रातील, पुणे शहरात जमिनीच्या खाली, एका दगडातून कोरलेली ही लेणी साधारण आठव्या शतकातील म्हणजेच, राष्ट्रकूट काळातील असल्याचे समजते. राष्ट्रकूट काळात पुणे या शहराचा उल्लेख हा पुण्यविषयक किंवा पूनकविषय असाही केला जात असल्याची नोंद, राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांच्या लिहिलेल्या ताम्रपटात आढळतो.

हेही वाचा : भटकंती करताना हे मशरूम दिसले तर अजिबात लावू नका हात! असू शकतात प्रचंड विषारी, पाहा

काहींना पाताळेश्वर लेणी आणि वेरूळच्या लेणींमध्ये साम्य वाटू शकते. कारण, या दोन्ही लेण्या या साधारण एकाच कालखंडात कोरल्या असल्याची शक्यता असल्याचे समजते. इतकेच नाही तर या पाताळेश्वर लेणींचा उल्लेख, हा पेशवे काळा आणि पांडव काळातही असल्याचे आढळते.

पेशवे काळातील आणि पांडव काळातील पाताळेश्वर लेणींचा उल्लेख

पांडव काळ : जेव्हा पांडव १२ वर्ष वनवासात होते तेव्हा त्यांनी काही काळ पुण्यात घालवला असल्याचे अनेकदा म्हटले जाते. तेव्हा, द्रौपदीने पाताळेश्वर लेणीमध्ये असणाऱ्या शिवलिंगाची पूजा केली होती असेही म्हटले जाते.

पेशवे काळ : पेशवे काळात, पेशव्यांनी या लेण्यांमध्ये असलेल्या मंदिराला दक्षिण दिल्याचा उल्लेख पेशव्यांच्या नोंदीमध्ये आढळतो.

पाताळेश्वर लेणीचे वर्णन

पाताळेश्वर लेणी हे एक शिवालय आहे. या लेणीला मोठे प्रांगण असून, या प्रांगणाच्या मध्यभागी एक मोठे वर्तुळाकार दगडी नंदी मंडप आहे. मोठ्या आणि अतिशय भक्कम अशा कातळ स्तंभांनी या नंदी मंडपाला पेलून धरले आहे. या मंडपाच्या आत एक सुंदर नंदी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतो. हा नंदी बहुदा नंतरच्या काळात तिथे ठेवण्यात आलेला असू शकतो.

हेही वाचा : ‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…

एकाच दगडातून कोरलेल्या या लेणीमध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि गणपतीची यांच्या मुर्त्यादेखील स्थापन केलेल्या आहेत. मात्र या मुर्त्या नंतर तिथे बसवल्या गेल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लेण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर, चौकोनी स्तंभाच्या रांगा असून, तीन गर्भगृह आपल्याला दिसतात. यातील मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे.

गर्भगृहाजवळ कोरीवकाम केलेला एक दगडी दरवाजादेखील आहे. लेण्यांच्या बाहेरील भागावर शिलालेख असल्याचे पाहायला मिळते. मात्र त्याची झीज झाली असल्याकारणाने तो शिलालेख वाचता येऊ शकत नाही.

भारत सरकारने, या पाताळेश्वर लेणीला राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून घोषित केले आहे. गजबजलेल्या या पुणे शहरामध्ये असणाऱ्या या सुंदर आणि शांत अशी पाताळेश्वर ही आवर्जून भेट देण्यासारखी आहे. अशी सर्व माहिती लोकसत्ताच्या ‘गोष्ट पुण्याची’ या युट्युब मालिकेतून समजते. तुम्ही या ठिकाणी गेला आहेत का कमेंट करून सांगा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jangali maharaj road pataleshwar caves history places in pune to visit when did this temple created check out in marathi dha