श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात, व्रत केली जातात. रिमझिम पावसाच्या धुंद मनमोहक वातावरणात आध्यात्मिक व धार्मिक परंपरांचा वारसा जोपासायचे काम श्रावण महिना करतो. श्रावणात येणाऱ्या अनेक सणांपकी सर्वाचा लाडका सण म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या कडेकोट बंदिवासात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला. विष्णूच्या या आठव्या अवताराचे या दिवशी पृथ्वीवर दुर्जनांच्या नाशासाठी झालेले हे आगमन, म्हणून हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो.
कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. एखाद्या लहान बाळाप्रमाणे कृष्णमूर्तीला आंघोळ घालून त्याच्यासमोर भक्तीगीते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी रात्री १२ वजता हा कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या वर्षी मात्र गोकुळाष्टमीची नक्की तिथी काय आहे याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम आहे. व्रत आणि पूजा कोणत्या दिवशी करावी याबद्दलही अनेकांना प्रश्न पडला आहे. या वर्षी अष्टमीची तिथी दोन दिवस असणार आहे. त्यामुळेच अनेकांचा गोंधळ उडाला आहे. हिंदू धर्मातील सर्व सण हे तिथीनुसार साजरे केले जातात. तिथी योग्य पद्धतीने समजून घेतली नाही तर व्रत आणि पूजा करतानाही अडचणी निर्माण होऊ शकतात. या वर्षी जन्माष्टमी १२ ऑगस्टला साजरी केली जाईल. मात्र ११ ऑगस्टपासूनच जन्माष्टमीची तिथी सुरु होत आहे. यामागील कारण म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या तिथीच्या दिवशी सूर्योदय होतो तिच तिथी कायम राहते. म्हणजे सूर्योदय पाच वाजता झाला आणि त्यावेळी द्वितिया तिथी सुरु असेल तर संपूर्ण दिवस द्वितीया तिथी मानला जाते. मग सात वाजता तृतीया तिथी सुरु होत असली तरी दिवस द्वितिया तिथीमध्येच गणला जातो.
११ ऑगस्ट रोजी म्हणजेच मंगळवारी सकाळी नऊ वाजून ६ मिनिटांनी अष्टमी तिथी सुरु होते. जी बुधावारी म्हणजेच १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजून १६ मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे १२ ऑगस्टचा सूर्योदय हा अष्टमीच्या तिथीचा सूर्योदय म्हणून मोजला जाईल. त्याच दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्याचा चांगला मुहूर्त आहे. मथुरा, वृंदावन आणि द्वारकेमध्येही १२ ऑगस्टला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जणार आहे.
सूर्योदयाप्रमाणे तिथी साजरी करण्याबरोबरच आणखीन एक विचार असाही आहे की दोन प्रकारचे भक्त असतात एक स्मार्त आणि दुसरे वैष्णव. यापैकी स्मार्त हे असे भक्त असतात जे आपल्या गृहस्थाश्रमातील जीवनाचा आनंद घेत असतात. सकाळ संध्याकाळ दोन वेळा देवाची पूजा करतात. तर वैष्णव हे असे भक्त असतात ज्यांनी आपले संपूर्ण जीवनच भगवान विष्णू किंवा श्री कृष्णाच्या नावे वाहून घेतलेलं आसतं. हे लोकं कायम देवाचे नामस्मरण करत असतात. त्यामुळे स्मार्त भक्त हे जी तिथी ज्या दिवशी असेल त्या दिवशी सण उत्सव साजरा केला पाहिजे असं मानतात. स्मार्त भक्त सूर्योदयाला तिथीशी जोडून पाहत नाहीत. तर वैष्णव भक्त हे तिथि सूर्योदयाप्रमाणे मानतात. त्यामुळे ते त्यानुसार व्रत, पूजा आणि देवाचा अभिषेक करतात.