Jyeshtha Gauri Naivedya: महाराष्ट्रभर गणपतीची धामधूम सुरु आहे. यंदा अधिक श्रावणामुळे सर्वच सण उत्सवांच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. यामुळेच दरवर्षीच्या तुलनेत गणपती बाप्पा सुद्धा साधारण १०-१५ दिवस उशिरा आले आहेत. उद्या म्हणजेच २१ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी आवाहन असणार आहे. म्हणजेच गौरीच्या रूपात साक्षात माता पार्वती माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीपूजनाच्या दिवशी मटण, कोंबडीवडे असा बेत करायची पद्धत आहे. या नैवेद्यात चिंबोऱ्या म्हणजेच खेकडे व मासे सुद्धा आवर्जून समाविष्ट केले जातात. पण यामागे नेमकं कारण काय हे तुम्हाला माहित आहे का?
कोकणात पहिल्या दिवशी गौराईला तांदळाच्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य गौराईला दाखवतात. तसंच हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी दाखवण्यात येतो. तर काही ठिकाणी लाडक्या गौरीसाठी तिखटाचाही नैवेद्य दाखवला जातो. ही परंपरा एका पौराणिक कथेवर आधारित आहे.
असं म्हणतात, गौरी म्हणजेच माता पार्वतीचे भगवान महादेवाशी लग्न झाल्यावर ती माहेरपणाला जात असते, तेव्हा शंकर भगवान तिच्यासह काही भूतगणांना रक्षणासाठी पाठवतात, माहेरवाशीण गौराईचे यावेळी माहेरी खूप लाड होतात पण भूतगणांना मांसाहार न मिळाल्याने त्यांची निराशा होते, अशावेळी गौराई आपल्या पाहुण्यांसाठी मांसाहार तयार करायला सांगते व सगळ्या भूतगणांचे जेवण उरकल्यावरच स्वतः अन्न ग्रहण करते.
यानुसार जेव्हा गणपतीच्या दिवसात ज्येष्ठा गौरी घरी येतात तेव्हा भूतगण सुद्धा तिच्या रक्षणासाठी आलेले असतात असे मानले जाते. या भूतगणांच्या आनंदासाठी मांसाहाराचा बेत केला जातो.यानुसार जरी नैवेद्य गौरीसमोर ठेवण्यात येत असला तरी तो देवी पार्वतीला नसून सोबत आलेल्या भूतगणांसाठी असतो. असं असलं तरी गौराई व नैवेद्यामध्ये तसेच गणपती बाप्पा व गौराईच्या मधोमध सुद्धा पडदा लावला जातो.
हे ही वाचा<< २ मिनिटात नऊवारी नेसून गौरी- गणपतीत मिरवा; पायभर साडी नेसण्याचा जुगाड मिस करू नका, पाहा Video
याशिवाय, पुराणात ज्येष्ठा लक्ष्मी व कनिष्ठा लक्ष्मी असा संदर्भ सापडतो. या पौराणिक संदर्भानुसार अलक्ष्मीचा वावर हा अनिष्ट, अशुभ ठिकाणी असतो, तर याउलट लक्ष्मी ही शुभ ठिकाणी विराजमान होते. मूलत: इष्ट व अनिष्ट ही एकाच लक्ष्मीची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अन्य शुभ मुहूर्तांवर कनिष्ठा म्हणजेच महालक्ष्मीची पूजा केली जाते पण आपल्याच बहिणीला नारायण भार्या लक्ष्मीने दिलेल्या वचनानुसार वर्षातील काही विशेष मुहूर्तांवर तिची पूजा केली जाते. म्हणूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्येष्ठेला दाखविण्यात येणारा मांसाहारी नैवेद्य हा निषिद्ध नाही.
(सदर लेख हा प्राप्त माहिती व संदर्भांवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)