शाळा हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक. शाळेत जाऊन जे शिक्षण मिळतं त्यावर पुढे आपण आपल्या आयुष्याचा पाया पक्का करत असतो. शाळा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जितकीच महत्त्वाची तितकंच महत्त्वाचं असतं दप्तर. एक काळ असा होता की दप्तरं ही आत्ता इतकी मॉडर्न आणि जड झालेली नव्हती. इतकंच काय त्याला सॅक असं नावही आलं नव्हतं. चौकोनी दप्तर असायचं. त्याआधी तर पिशवीतून वह्या पुस्तकं घेऊन शाळेत विद्यार्थी जात असत. ज्यांच्या घरातली परिस्थिती बरी असे ते विद्यार्थी पेटी किंवा दप्तर आणत. मात्र दप्तर हा शब्द मराठी भाषेत कसा आला माहित आहे?
दप्तर शब्द मराठी भाषेत कसा आला?
लेखी कागद बांधून ठेवण्याचं फडकं म्हणजे फारसी भाषेतलं दफ्तर. मराठीत त्यावरुनच शब्द तयार झाला दप्तर. मुलांच्या या दप्तरात पुस्तकं आणि वह्या असतात. इतिहासात डोकावलं तर दप्तराचा उपयोग नेमका याच कामासाठी म्हणजेच लेखी कागद ज्या कापडी फडक्यात बांधून ठेवले जात त्याला दप्तर म्हटलं जातं. फारसी भाषेतला हा शब्द दफ्तर होता. मराठी भाषेत दफ्तरचं दप्तर झालं. इतकंच नाही तर दप्तर सांभाळण्यासाठी जे अधिकारी असत त्यांना दफ्तरदार/दप्तरदार म्हणत. आजही हे आडनाव मराठीत आढळतं. देविका दफ्तरदार हे अभिनेत्रीचं नाव आपल्याला चांगलंच परिचित आहे.
‘दफ्तर’ या फारसी शब्दात आहे ‘दप्तर’ या शब्दाचा उगम
फारसीतल्या दफ्तर या शब्दात आपल्या मराठीतल्या दप्तर या शब्दाचा उगम आढळतो. सदानंद कदम लिखित ‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकात ही माहिती दिली आहे. बघा इतके दिवस आपण सगळ्यांनी हे दप्तर पाठीवर बाळगलं आहे. दप्तराचं ओझं कमी करा वगैरे सारखे बातम्यांचे मथळेही वाचले आहेत, पण हा शब्द मूळ फारसीतून आलाय माहित होतं का? नाही ना… मग चला आता सगळ्यांना सांगा दप्तर शब्द मराठी भाषेत कुठून आलाय. सांगायचं नसेल तर ही लिंक पाठवा ते स्वतःच उघडून वाचतील.