आपल्याकडील पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास ते वाढतात. त्यामुळेच अनेकजण पैसे वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणं पसंत करतात. मात्र, गुंतवणूक करताना विश्वासार्ह माध्यमही तितकंच महत्त्वाचं असतं. भारतात सर्वसामान्य नागरिकांसाठी असंच एक विश्वासाचं गुंतवणूक ठिकाण म्हणजे भारतीय पोस्ट विभाग. याच पोस्ट खात्याच्या काही योजना अशा आहेत ज्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला काही वर्षात दुप्पट पैसे मिळतील. अशाच पोस्ट खात्याच्या काही योजनांचा हा आढावा.
१. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit)
पोस्ट विभागाच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला अगदी खात्रीने दुप्पट पैसे मिळतील. जर तुम्ही १ ते ३ वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक केली, तर तुम्हाला ५.५ टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे ५ वर्षांसाठी गुंतवणक केल्यास गुंतवणूकदारांना ६.७ टक्के व्याज मिळते. या व्याजदराने तुम्ही पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला जवळपास १०.७५ वर्षात दुप्पट पैसे मिळतील.
२. पोस्ट कार्यालय बचत बँक खातं (Post Office Savings Bank Account)
या योजनेत अनेक लोक आपलं खातं सुरू करतात. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की या खात्यात १८ वर्षे पैसे जमा करत राहिलं तर पैसे दुप्पट होतात. या खात्यात तुम्हाला कितीही पैसे टाकता येतात. या खात्यातील रकमेवर तुम्हाला ४ टक्के व्याज मिळते.
३. पोस्ट कार्यालय आवर्ती ठेव (Post Office Recurring Deposit)
या योजनेत तुम्हाला बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर मिळतं. तुमच्या गुंतवणुकीनुसार ठेवीवर ५.८ टक्के व्याज दर मिळतं. या हिशोबाने तुम्हाला १२.४१ वर्षात दुप्पट पैसे मिळतील.
४. पोस्ट कार्यालय मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)
काही लोक आपल्या उत्पन्नानुसार दर महिन्याला पैशांची बचत करतात. त्यांच्यासाठी पोस्ट विभागाची ही योजना चांगली आहे. या योजनेत तुम्हाला 6.6 टक्के व्याज मिळतं. या हिशोबाने तुम्हाला 10.91 वर्षात दुप्पट पैसे मिळतील.
५. पोस्ट कार्यालय वरिष्ठ नागरिक बचत योजना (Post Office Senior Citizens Savings Scheme)
पोस्टाच्या योजनांमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी खास योजना आहेत. या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.4 टक्के व्याज दर मिळतं. या हिशोबाने 9.73 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात.
६. पोस्ट कार्यालय पीपीएफ (Post Office PPF)
तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर पोस्ट विभागाची पीपीएफ ही योजना गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज देते. या व्याजदराने तुम्हाला 10 वर्षात दुप्पट पैसे मिळतील.
७. पोस्ट कार्यालय सुकन्या समृद्धी खातं (Post Office Sukanya Samriddhi Account)
सरकारने गरीब मुलींच्या विकासासाठी ही योजना सुरू केली. या योजनेचं नाव सुकन्या समृद्धी खातं योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.6 टक्के व्याजदर मिळेल आणि ९.४७ वर्षात दुप्पट पैसे मिळतात. मात्र, ही योजना केवळ मुलींना लागू आहे.
८. पोस्ट कार्यालय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (Post Office National Saving Certificate)
या योजनेविषयी अनेक लोकांना माहिती नाही. मात्र, या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.8 टक्के व्याज मिळतं. ही 5 वर्षांची बचत योजना आहे. सोबतच आयकरात सवलत मिळवण्यासाठी देखील या योजनेची मदत होते.