आपल्या शरीराची उंची आणि आरोग्याचा थेट संबंध असतो. आरोग्य चांगलं आहे की बिघडलं हे संबंधित व्यक्तीच्या वाढीवर ठरवलं जातं. या वाढीत उंची आणि वजन हे महत्त्वाचे घटक असतात. अशाच या उंचीबाबत एक नवा अभ्यास अहवाल समोर आलाय. यानुसार जगभरातील लोकांची सरासरी उंची वाढत आहे, मात्र भारतात हीच उंची कमी होत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जगभरातील लोक उंच होत असताना भारतीय लोक काहीसे खुजे होत असल्याचं निरिक्षण या अभ्यास अहवालात मांडण्यात आलंय.

या अभ्यास अहवालात १९९८ ते २०१५ या कालावधीतील १५ ते २५ आणि २६ ते ५० या दोन वयोगटाच्या पुरूष आणि महिलांच्या उंचीचा अभ्यास करण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणांतर्गत केलेल्या या अभ्यासात भारतीयांची उंची कमी होत असल्याचं समोर आलं. भारतासाठी ही काळजीची गोष्ट मानली जातेय. कारण उंची पोषण, सार्वजनिक आरोग्य आणि देशाच्या राहणीमानाच्या दर्जाचं मूलभूत एकक मानलं जातं. अनेक जाणकार तर उंचीतील हा बदल भारताच्या सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक उद्दिष्टांमध्ये झालेली अधोगती दर्शवत असल्याचं मत मांडत आहेत.

“भारतातील प्रौढांच्या उंचीतील घट गंभीर इशारा”

हा संशोधन अहवाल लिहिणाऱ्या संशोधकाने देखील जगात लोकांची उंची वाढत असताना भारतातील प्रौढांच्या उंचीतील घट गंभीर इशारा असल्याचं म्हटलंय. तसेच तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. २००५ ते २०१६ दरम्यान १५ ते ५० वयोगटातील भारतीयांची सरासरी उंची कमी झालीय. यात २६ ते ५० वयोगटातील भारतीय महिलांचा केवळ अपवाद आहे. १५ ते २५ वयोगटातील महिलांच्या सरासरी उंचीत ०.१२ सेमीची घट झालेली दिसली. मात्र, २६ ते ५० वयोगटाच्या महिलांच्या उंचीत ०.१३ सेमीने वाढ झालीय.

गरीब महिलांच्या उंचीत घट

पुरूषांचा विचार करता १५ ते २५ वयोगटातील पुरूषांच्या सरासरी उंचीत १.१० सेमीची घट झालीय. तसेच २६ ते ५० वयोगटात ही घट ०.८६ सेमी इतकी आहे. इतरांच्या तुलनेत आदिवासी महिलांच्या उंचीत अधिक घट झालीय. ही घट ०.४२ सेमी आहे, तर गरीब आर्थिक स्थिती असलेल्या महिलांमधील उंचीतील घट यापेक्षा जास्त म्हणजेच ०.६३ सेमी इतकी आहे.

मध्यमवर्गीय ते श्रीमंत वर्गातील महिलांच्या उंचीत वाढ

दुसरीकडे मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अतीश्रीमंत महिलांच्या सरासरी उंचीत वाढ झालीय. ही वाढ ०.२० सेमी आहे. ग्रामीण भागात हीच वाढ ०.०६ सेमी इतकी आहे. त्यामुळेच अभ्यासक उंची, आरोग्य आणि आर्थिक स्थिती याचा संबंध जोडत आहेत. तसेच बिघडलेल्या आर्थिक स्थिती आणि आरोग्यामुळेच भारतीयांच्या उंचीत घट झाल्याचं निरिक्षण नोंदवत आहेत. २६ ते ५० वयोगटातील पुरूषांच्या उंचीतील सर्वाधिक घट कर्नाटकमध्ये झालीय. ही घट २.०४ इतकी आहे.

हेही वाचा : आल्यामुळे कमी होऊ शकतं यूरिक अ‍ॅसिड; अशा पद्धतीने करा उपाय

प्लोस वन या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झालाय. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कृष्ण कुमार चौधरी, सयन दास आणि प्राचीनकुमार घोडाजकर यांनी हा अभ्यास केलाय.

भारताची सार्वजनिक आरोग्याची स्थिती काय?

२०२० च्या ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारत १०७ देशांच्या यादीत ९४ व्या क्रमांकावर आहे. भारतात कुपोषित मुलांची संख्या देखीलही मोठी आहे. भारतातील १० मोठ्या राज्यांपैकी ७ राज्यांमध्ये कुपोषित मुलांची संख्या वाढताना दिसत आहे. एकूणच पोषणाचा भारतीयांच्या शारीरिक वाढीवर थेट परिणाम होताना दिसत आहे.

Story img Loader