फळे आणि भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे अनेक आहारतज्ज्ञ वेळोवेळी आपल्याला आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस करतात. पण, आरोग्यासाठी कोणती फळे किंवा भाजी खाणे फायदेशीर असते हे कसे समजणार? अशा वेळी तुम्ही फळे आणि भाज्यांच्या रंगांवरून त्यांचे गुणधर्म ओळखू शकता. फळे आणि भाज्यांच्या विविध रंगांमधून तुम्ही त्यांच्या फायद्याबाबत बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकता. ते कसे ते आपण पाहू ….
हिरवा रंग
हिरव्या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए (कॅरोटिन), व्हिटॅमिन सी व बी कॉम्प्लेक्स इत्यादी आढळतात, असे निसर्गोपचार तज्ज्ञांचे मत आहे. त्याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन व झेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंटस् असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर त्याने हिरव्या रंगाची फळे आणि भाज्या खाव्यात. त्यामुळे शरीरातील रक्त झपाट्याने वाढते. त्याशिवाय पालेभाज्या खाल्ल्याने रक्तासोबतच दृष्टीही सुधारते.
जांभळा रंग
वांगी, काळी द्राक्षे, चेरी, ब्ल्यू बेरी, गुसबेरी, स्ट्रॉबेरी इत्यादींचा रंग जांभळा असतो. या रंगाच्या फळे आणि भाज्यांमध्ये अनेक पोषक घटकांव्यतिरिक्त अँथोसायनिन्स आढळते; जे कॅन्सरविरोधी मानले जाते. या गोष्टी खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होतो, तसेच तुमची रक्तवहिन्यासंबंधीची प्रणाली चांगली राहते. त्यामुळे तुमची स्मरणशक्तीही सुधारते.
लाल रंग
लाल रंगाची फळे आणि भाज्या दुरूनच कोणालाही आकर्षित करतात. तुम्ही रंगावरूनच त्याचे फायदे समजून घेऊ शकता. या रंगाची फळे किंवा भाज्या खाल्ल्याने शरीरातील रक्त वेगाने वाढते. लाल रंगाची फळे आणि भाज्या अॅनिमियाच्या रुग्णांसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. याशिवाय त्यामध्ये लाइकोपिन आढळते; जे कॅन्सर, हृदयाशी संबंधित आजार व डोळ्यांच्या समस्या दूर करण्यात मदत करते.
केशरी आणि पिवळा
केशरी किंवा पिवळ्या रंगाची फळे किंवा भाज्या खाल्ल्याने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामध्ये कॅरोटिनोइड्स, ल्युटीन, झेक्सॅन्थिन, व्हायोला-झेंथिन आणि इतर अनेक फायटोन्यूट्रिएंट्स असतात; जे तुमच्या मज्जासंस्थेसाठी खूप चांगले आहेत.
तपकिरी आणि पांढरा
तपकिरी आणि पांढर्या रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल व अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. या गोष्टी हाडांसाठीही फायदेशीर मानल्या जातात.